Join us

Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 1:21 PM

साखर उद्योगाची भविष्यातील वाटचाल महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला साधारण शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तथापि १९५० पासून कारखानदारीमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याचे दिसते.

साखर उद्योगाची भविष्यातील वाटचाल महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला साधारण शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तथापि १९५० पासून कारखानदारीमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याचे दिसते. विशेषतः सहकार क्षेत्रामध्ये त्याची जास्त वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात १९५० साली सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाला. आजअखेर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे साखर कारखाने आहेत. परंतु गेल्या पहिल्या जवळजवळ पन्नास वर्षांत म्हटलं तरी साखर ८० टक्क्यांपासून ६०-५०-४० टक्क्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने लेव्हीसाठी घेतली जात होती.

त्याचा दरही निश्चित होता. उसाला किमान किती दर द्यायचा याबाबत एक कायदा होता. त्यामुळे कारखानदारीमध्ये पहिल्या पन्नास वर्षांमध्ये फार मोठे बदल झालेले दिसत नाहीत. जे काही बदल झाले, ते गरजेनुसार तांत्रिक विभागामध्ये झाले.

पण अलीकडच्या वीस वर्षांमध्ये साखरेशिवाय डिस्टलरी आली, पण डिस्टलरीपेक्षाही बर्‍याच प्रमाणात वीजनिर्मितीचेही प्रयोग सुरू झाले आणि तेव्हापासून बर्‍यापैकी तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेले, वाढ होत गेली.

खर्‍या अर्थाने साखरेशिवाय उपपदार्थ ज्याला आपण म्हणू, इतर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे तंत्रज्ञानामधले बदल पूर्वीच्या वीस वर्षांच्या मानाने या वीस वर्षांत मोठ्या प्रमाणावर झाले. त्याचा फायदा म्हणून कारखान्यांनी स्वतःच्या वापरासाठी लागणारी वीज तयार करून अतिरिक्त वीज ही सरकारच्या वीज खात्याला विक्री करण्यास सुरुवात केली. हा एक टप्पा झाला.

अलीकडच्या काळामध्ये आणि विशेषतः माहिती तंत्रज्ञानाचे तंत्र विकसित झाल्यामुळे आणि त्यातील क्रांतिकारक बदल झाला आहे, ज्याला एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आपण म्हणतो, त्याच्या क्रांतिकारक आगमनामुळे आता साखर उद्योगही त्यापासून बाजूला राहू शकत नाही. किंबहुना भविष्यामध्ये साखर उद्योग हा कसा असू शकेल आणि या तंत्रज्ञानाचा तो कसा वापर करू शकेल, हेच साखर उद्योगापुढील खरे आव्हान असेल.

१) सर्वप्रथम आपण शेतीविभाग म्हणजे ऊस उत्पादकतेमध्ये काय बदल होऊ शकतील, याबाबत पाहू या. मशीन लर्निंग किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन्हींच्या समन्वयाने उसाचे क्षेत्र किती आहे, याची पूर्ण माहिती आता आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे ऊस किती उपलब्ध आहे? आपण किती गाळप करू शकणार आहे? याबाबतचा एक पूर्वीचा जो ठोकताळा होता, त्याच्यापेक्षा एका अर्थानं अगदी योग्य आणि पूर्णतः वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळू शकते. त्याच जोडीला पूर्वीचा उसाच्या लागवडी क्षेत्रासंदर्भातील, उत्पादनासंदर्भातील त्या माहितीचा डेटा आणि हवामानातील जो बदल आहे, पॅटर्न आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून एकरी उत्पादकता कशी वाढवता येईल, याबाबतचे मार्गदर्शन आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मिळू शकेल.

त्याच जोडीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर ड्रोनचा वापर करून उसावर होणारे रोग, कीड यांची माहिती मिळून आपण वेळीच कोणती उपाययोजना करू शकतो, याचेही मार्गदर्शन मिळेल. त्याच्याही पुढे जाऊन तोडणी कार्यक्रम करत असताना तो उतार्‍यावर आधारित, रिकव्हरी बेस्ड कसा असावा आणि कुठला ऊस कधी तोडावा यासंबंधीची माहिती उसामध्ये असलेल्या साखरेच्या प्रमाणानुसार, ज्याला पोल इन साखर किंवा उसावर आधारित तोडणी कार्यक्रम कसा राबवावा, जेणेकरून कारखान्याला चांगल्यातले चांगला साखरेचा उतारा मिळू शकेल, अशा पद्धतीचे मार्गदर्शन हे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांच्याद्वारे मिळू शकेल. 

२) हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणि ड्रोन, मशीन लर्निंग इत्यादी अद्ययावत यंत्रणेचे फायदे घेत असताना आपल्याकडे जी जमीन खूप छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आहे, त्यावर प्रयोग होणं हे थोडंसं जड जाणार असल्यामुळे भविष्यामध्ये शेती एकत्र करून सामुदायिक शेतीचे जे पूर्वी प्रयोग झाले, त्या धर्तीवरच दोनशे एकर, शंभर एकर किंवा त्याहून जास्त शेती एकत्र करून त्या पद्धतीने त्याचे लागणी कार्यक्रम, तोडणी कार्यक्रम, त्याच्यावरचे वेळोवेळचे मार्गदर्शन, उत्पादकता वाढविण्याविषयीचे मार्गदर्शन अशा प्रकारे भविष्यामध्ये होऊ शकेल किंवा होणं गरजेचं ठरेल असे वाटते. 

३) कारखान्यामधील इंजिनिअरिंग आणि उत्पादन विभागामध्येसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा घेऊन वाया जाणारे तास कसे कमीत कमी करता येतील, त्या आधारे आपल्याला सूचना मिळतील आणि प्रेडक्टिव्ह मेंटेनन्स (पूर्वसूचना) येणार्‍या मेंटेनन्सची पूर्वसूचना घेऊन वेळीच त्याचा मेंटेनन्स घेऊन वाया जाणारे तास कमी करता येतील. मशीन लर्निंगद्वारे वेगवेगळी माहिती घेऊन सेन्सरद्वारे जे काही दोष आहेत, ते काढून साखरेची गुणवत्ता वाढविण्याच्या सूचना आपल्याला मिळू शकतात. 

४) साखर निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीज आणि वाफ म्हणजे एनर्जीचा जो वापर आहे, तो कसा कमीत कमी करता येईल, अशा प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला यातून मिळू शकेल. 

५) साखरेच्या उत्पादन प्रक्रियेमधील उत्पादकता वाढवली जाईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरील रिअल टाइम मॉनिटरिंगच्या आधारे वेगवेगळ्या प्रक्रियांमधील टप्पे- तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा इतर घटक असतील- यांच्यावर निरीक्षण करून नियंत्रण ठेवू शकू. विशेष महत्त्वाचे म्हणजे प्रोसेसमध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या कार्यपद्धतीवर जो काही कंट्रोल असेल, तो या एआयच्या आधारे तुम्ही कुठूनही करू शकाल. म्हणजे त्यासाठी फॅक्टरीत बसून करावे लागेल असे नाही. तुम्ही अन्य ठिकाणी बसून रिमोटद्वारे ते ऑपरेट करू शकाल, चालवू शकाल अशा प्रकारचे बदल येत्या काळामध्ये साखर उद्योगामध्ये आलेले दिसतील. 

६) सध्या जी काही साखर तयार होते, ती संपूर्ण खुल्या मार्केटमध्ये विकली जाते आणि आताच्या अभ्यासानुसार साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के साखरच घरगुती वापरासाठी वापरली जाते. उर्वरित सर्व साखर ही उद्योगधंद्यांमध्ये जसे की, चॉकलेट, आइस्क्रीम, बिस्कीट, मिठाई इत्यादी ठिकाणी वापरली जात असल्यामुळे ग्राहकाच्या मागणीनुसार साखर बनवणे हे कारखानदारीला क्रमप्राप्त होईल. कारण आता आपण छोटी साखर, मोठी साखर (स्मॉल, मीडियम, लार्ज) अशा प्रकारच्या साखर बनवतो.

७) सध्याच्या मानांकनानुसार आपण सल्फेटेड शुगर बनवत असल्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सल्फर कंटेंट असतो. परंतु भविष्यामध्ये सल्फरलेस शुगर जसे की गोडे तेलामध्ये कोलेस्टेरॉल फ्री ऑइल अशा प्रकारची ऑइलची मागणी वाढत चाललेली आहे, त्याप्रमाणे सल्फरलेस किंवा रिफाईन शुगरची मागणी वाढेल. त्या दृष्टीने कारखान्यांना बदल करावे लागतील किंवा भविष्यामध्ये सल्फरलेस शुगर कारखान्यांना तयार करावी लागेल. 

८) काही इंडस्ट्रीजची डिमांड लिक्विड शुगरची असेल, काहींची अत्यंत बारीक साखरेची असेल, काही लोकांची अगदी पावडर फॉर्ममधलीदेखील असेल. त्या पद्धतीने उत्पादन करण्याची आणि ती ग्राहकांना देण्याची जबाबदारी किंवा बदल कारखानदारीत येतील आणि ते कारखानदारीला स्वीकारावं लागेल.

९) अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा विकास जो इंडस्ट्रीमध्ये झाला आहे तो इथेनॉलचा. संपूर्ण उसाची साखर न बनवता काही प्रमाणामध्ये साखर अल्कोहोल आणि अल्कोहोलपासून इथेनॉल जे पेट्रोलमध्ये मिसळले जाते, त्याच्यासाठी वापरली जाते. त्या दृष्टीने केंद्र शासनाने एक मोठी महत्त्वाकांक्षी योजना केली आहे आणि येत्या एका वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण वीस टक्क्यांवर नेण्याचं असल्यामुळे जवळजवळ एक हजार कोटी लीटरची मागणी इथेनॉलसाठी येणार असल्यामुळे इथेनॉलचा कृतीकार्यक्रम कारखान्यांनी घेतलेलाच आहे, पण तोही मोठ्या प्रमाणात घ्यावा लागेल. पण त्याच जोडीला आता विमानामध्ये वापरलं जाणारं जे इंधन आहे, त्याच्यामध्ये इथेनॉल वापरायचे, त्याच्यामध्ये टूजी म्हणजे डायरेक्ट बगॅसपासून किंवा इतर फॉसीफ्युअल आहेत, त्याच्यापासून इथेनॉल करण्याचे प्रयोग सुरू आहेत, ते यशस्वी होत आहेत आणि भविष्यामध्ये कारखान्याला त्यापासूनही इथेनॉल निर्माण करून त्याची विक्री करावी लागेल किंवा तयार करावे लागेल. 

१०) त्याच जोडीला कारखान्यामध्ये डिस्टलरीमधून जो बायोगॅस तयार होतो, त्याच्यापासून सीबीजीही (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) ही तयार करण्याची योजना केंद्र शासनाने काढलेली आहे. त्या दृष्टीने कारखानदारी प्रायोगिक तत्त्वांवर काही प्रमाणात पावले टाकलेली आहेत, पण भविष्यामध्ये हे प्रमाण वाढेल; किंबहुना सर्वांनाच उद्या सीबीजीमध्ये जावं लागेल. ते एक प्रकारचं साखरेच्या जोडीला पूरक उत्पादन म्हणून त्यातून काही प्रमाणामध्ये महसूल किंवा काही प्रमाणामध्ये उत्प्पन्न कारखान्याला मिळू शकेल.

११) अशा पद्धतीने कारखानदारीमध्ये जे जे बदल येणार आहेत, त्याच्या जोडीला अतिशय महत्त्वाचा बदल असा दिसतो की, महाराष्ट्रामध्ये झालेल्या एकंदरीत गळितामध्ये निरीक्षण करून आपण एकंदर जर माहिती घेतली तर असं दिसेल की, सुमारे एक हजार लाख किंवा एक हजार पन्नास लाख टन ऊस गाळप होतो, पण त्यापैकी जवळजवळ २५ टक्के ऊस हा पाच ते सात समूह आहेत, त्यांच्या कारखानदारीतून होतो. म्हणजे एक प्रकारे कारखानदारीचं कन्सल्डरेशन होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं म्हणावं लागेल. 

येत्या भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये हे प्रमाण ५०-६० टक्क्यांवरसुद्धा जाऊ शकेल. म्हणजे एकूण गाळपातलं ५०-६० टक्के गाळप हे आठ ते दहा समूहांच्या हातात असेल तर उर्वरित ४० टक्के गाळप करणारे जे सिंगल युनिट किंवा एकल कारखाना असेल, त्या कारखानदारीला खूप मेरिटवर काम करावं लागेल. कारण समूहामध्ये जे गाळप होतं, त्यांच्यामध्ये त्यांचा बर्‍यापैकी उत्पादन खर्च ते कमी करू शकतात. त्यांचा प्रशासकीय खर्च कमी येऊ शकतो, अन्य खर्च कमी येऊ शकतात आणि त्याचा फायदा त्यांचा उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे अ‍ॅटोमेटिकली ती स्पर्धा आता एकल कारखान्यांनाही करावी लागेल. ते एकल कारखाने विशेषतः सहकारामधीलच असतील असे दिसते. त्यामुळे एकंदरीत भविष्यातील साखर कारखानदारीमध्ये सहकारी साखर कारखानदारीला खूप स्पर्धा आणि गुणवत्तापूर्ण काम करावं लागेल. अन्यथा या स्पर्धात्मक वातावरणामध्ये त्यांचं टिकून राहणं जड वाटतं.

विजय औताडेलेखक साखर उद्योगाचे अभ्यासक आहेत.

टॅग्स :साखर कारखानेऊसमहाराष्ट्रशेतीशेतकरीआर्टिफिशिअल इंटेलिजन्ससरकारकेंद्र सरकारराज्य सरकारपेट्रोलपीकपीक व्यवस्थापन