सुरू उसाची तोडणी झाल्यानंतर खोडवा उसाचे व्यवस्थापन करणे आणि खोडवा उसातून चांगले उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. राज्यातील ३५ ते ४० टक्के उसाचे क्षेत्र हे खोडवा उसाचे असून त्यातून केवळ २५ ते ३० टक्के उत्पादन मिळते. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी खोडवा पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
१) बुडखे छाटणे
ऊस तुटून गेल्यानंतर उसाच्या बुडख्यावरील पाचट बाजूला सारून उसाचे बुडखे मातीच्या बरोबरीने कट करायचे आहे. बुडखे छाटण्यासाठी कोयत्याचा वापर केल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाविस्टिनची फवारणी उसाच्या बुडख्यावर करायची आहे.
२) पाचट कुजवणे
अनेक शेतकरीऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळून टाकतात. पण एकरी साधारण ३ टन पाचट जाळले तर त्यापासून मिळणारे अन्नद्रव्य मातीला मिळत नाही. पाचटामुळे वर्षभरात उसाला लागणारे पाणीसुद्धा कमी लागते. खोडवा उसाचे पाचट दोन सऱ्यांच्या मध्ये जमा करून त्यावर पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंची फवारणी करणे गरजेचे आहे. हेक्टरी १० किलो या प्रमाणात पाचटावर जिवाणूंची फवारणी करायची आहे.
३) खताचे नियोजन
पहारीच्या सहाय्याने खोडवा पिकाला खते देणे गरजेचे आहे. ऊस तुटून गेल्यानंतर हलके पाणी देऊन १५ दिवसांच्या आत खतांचा डोस देणे गरजेचे आहे. ४ गोणी युरिया, १ गोणी सिंगल सुपर फॉस्पेट, १ गोणी पोटॅश मिक्स करून पहारीच्या साहाय्याने १५ ते २० सेंमी खड्ड्यात मुठीने खत द्यावे. हे खत थेट मुळीला मिळत असल्यामुळे उसाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. खताचा दुसरा डोस १३५ दिवसांच्या अंतराने द्यायचा आहे.
४) तण व्यवस्थापन
उसामध्ये पाचट ठेवले तर तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. तणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आणि विद्यापिठाने शिफारशित केलेल्या तणनाशकाचा वापर करावा.
५) आंतरपिके
खोडवा उसामध्ये आंतरपिके घेतली तर अधिकचे उत्पादन मिळते आणि खोडवा उसाच्या व्यवस्थापनाचा खर्च निघून जातो.
माहिती स्त्रोत
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण