आडसाली ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारीत ऊस वाणांचा आणि दर्जेदार बियाण्याचा वापर, ५ फुट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आंतरमशागत या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.
आडसाली ऊसासाठी रासायनिक खतांचे नियोजन
आडसाली ऊसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाशची शफारस केली आहे. युरिया खत देताना निंबोळी पेंडीच्या भुकटी बरोबर ६ः१ या प्रमाणात मिसळून द्यावीत.
आडसाली ऊसाला खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर)
पहिल्या तीन रकान्यात हेक्टरी अन्नद्रव्य तर नंतरच्या तीन रकान्यात हेक्टरी खत मात्रा आहे.
खतमात्रा देण्याची वेळ | नत्र | स्फुरद | पालाश | युरिया | सिं.सु.फॉ | म्यु.ऑ.पो |
लागणीच्या वेळी | ४० | ८५ | ८५ | ८७ | ५३१ | १४२ |
लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी | १६० | - | - | ३४७ | - | - |
लागणीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी | ४० | - | - | ८७ | - | - |
मोठ्या बांधणीच्या वेळी | १६० | ८५ | ८५ | ३४७ | ५३१ | १४२ |
एकूण | ४०० | १७० | १७० | ८६८ | १०६२ | २८२ |
को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रती हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
विद्राव्य खतांचा वापर
- ठिबक सिंचनातून खते दिल्यास खतांची कार्यक्षमता ९० टक्क्यापर्यंत वाढते, तर प्रचलित पध्दतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात.
- लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
- नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खते देण्यासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा.
- पालाश खतांच्या वापरासाठी पांढरे पोटॅशियम क्लोराईड वापरावे. याशिवाय पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतात १९:१९:१९,२०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ तर द्रवरुप खतात ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते प्रमाणबध्द व शिफारसीप्रमाणे वापरावीत.
अधिक वाचा: Sugarcane Planting : उसाची रोपाने लागवड कशी करावी व एकरी किती रोपे लावावीत