ऊस उत्पादन कमी होण्याची कारणे शेतीतसेंद्रिय खताचे महत्त्व व प्रचलित सेंद्रिय खत वापराचे मार्ग आपण मागील भागात पाहिले. सेंद्रिय खत भरपूर वापरणे गरजेचे आहे. हे लक्षात आले.
माझी १०-१२ एकर शेती. मागील २५ वर्षांपासून सेंद्रिय खताचे महत्त्व समजत होते. माझी शेती कोल्हापूर शहराजवळ आहे. घरच्या ४-५ जनावरांचे खत, याव्यतिरिक्त कोल्हापुरातील गवळ्यांचे कडील शेणाचे ढीग शक्य तो खरेदी करून आणावयाचे.
उसाचा पाला ऊस तुटल्यानंतर जागेला उपलब्ध होणारा गोळा करून एक शेणाचा थर एक पाल्याचा थर लावून शक्य तितके जास्तीत जास्त खत तयार करावयाचे असे चालू ठेवले होते. शेतकरी धर्मात एक अशी (गैर) समजूत आहे की, एकदा भरपूर खत टाकले की, पुढे त्याचा वापर २-३ वर्षे चालू राहतो.
ऊस लावण, खोडवे व तिसऱ्या वर्षी भात असा फेरपालट. भात पेरणीपूर्वी तयार झालेले खत जमीनीत पूर्ण मशागतीत शक्य तितके टाकले जाईल, कारण ते मातीत कुळवायचे पाळीत व्यवस्थित मिसळणे शक्य असे.
कितीही खत तयार केले तरी ते फक्त भात पिकालाच वापरले जाई. भात कापणीनंतर कारखान्याला लावणी करून लवकरात लवकर पाळीत नाव नोंदविण्याच्या गडबडीत सेंद्रिय खत टाकण्यास वेळच मिळत नसे. वरील समजुतीपोटी आपले ४ वर्षातून एकदा भरपूर खत पडते हे बरोबर आहे या गैर समजुतीत २०-२५ वर्षे गेली.
उत्पादन पातळी घटू लागल्यानंतर ती केवळ सेंद्रिय खता अभावी घटत आहे हे लक्षात आले. प्रचलित मार्गाने प्रत्येक वर्षी टाकणे शक्य नाही हेही कळत होते. यावर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे.
यासाठी शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. तामीळनाडूतून ऊस शेतीसंबंधित एक ग्रंथ वाचून त्याचा अभ्यास केला. त्या ग्रंथात एका पानावर एक आकृती छापली होती. एक झाड जमीनीवर वाढलेले दाखविले होते.
त्याचा खोडाचा भाग जमिनीवर तर मूळांचा पसारा जमिनीखाली दाखविला होता. मुळांच्या शेवटी जी अन्नशोषण करणारी पांढरी अगर केशमूळे दाखविली होती या केशमूळा सभोवताली टिपके टाकले होते व ते सुक्ष्मजंतू आहेत इतकाच उल्लेख तेथे होता.
ते सुक्ष्मजीव ज्याअर्थी केशमूळाभोवती आहेत त्या अर्थी वनस्पतीच्या अन्नपोषणाचा व त्यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे इतके यातून ध्यानात आले, पिकाचे उत्पादन ज्याअर्थी घटत चालले आहे त्या अर्थी या सुक्ष्मजीवांचे काम पूर्वीसारखे होत नसावे का होत नसावे?
हे या सुक्ष्मजीवाचा वरील विज्ञान शाखा भू-सुक्ष्मजीवशास्त्र या शास्त्रशाखेचा अभ्यास केल्यास कदाचित लक्षात येईल. या समजूतीतून या शास्त्रशाखेचा अभ्यास करण्याचे निश्चित केले. पुण्यातील एका दुकानात एक ग्रंथ सापडला. त्या ग्रंथात वरील सुक्ष्मजीवावर एक स्वतंत्र धडा आहे हे वाचल्यावर ते पुस्तक खरेदी केले, व अभ्यास केला.
या अभ्यासातून असे लक्षात आले कि, या शास्त्रशाखेचा अभ्यास केल्यास आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. कोल्हापूरात येऊन वेगवेगळ्या ग्रंथालयातून १०-१५ मोठमोठे ग्रंथ आणून त्याचा अभ्यास केला. यातुन अनेक नवनवीन गोष्टी लक्षात आल्या.
प्रत्येकवर्षी सेंद्रिय खत हवेच
● हे केशमुळाभोवताचे टिपके म्हणजेच सुक्ष्मजीवच, पिकाला अन्नद्रव्ये उपलबध करून देण्याचे काम करतात. त्यांनी हे काम व्यवस्थित केले नाही तर पिकाचे पोषण व्यवस्थित होऊ शकणार नाही.
● पूर्वी त्यांचे काम व्यवस्थित होत होते. म्हणून उत्पादन मिळाले. आता तसे मिळत नाही, ते व्यवस्थित काम करीत नाहीत याला कारण त्यांचे खाद्य म्हणजेच सेंद्रिय खत ते जमिनीत पुरेसे नाही.
● इथे या शास्त्राने शिकविले की, आपण जे शेणखत कंपोस्ट टाकतो ते एका ३-४ महिन्याच्या हंगामी पिकाअखेर संपून जाते. (९०-९५%) याचा अर्थ असा की, मी भाताला टाकलेले खत भात पिकाअखेर संपले व पुढील दोन उसाची पैसे देणारी पिके नगण्य सेंद्रिय खतातून आजपर्यंत पिकविली जात होती.
● उत्पादन कमी होण्यामागचे हे सर्वात मुख्य कारण आहे. असे असेल तर प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला सेंद्रिय कर्ब पुरेसा दिला तरच है शेतीच चाक भावी काळात पुढे जाणार आहे. नाहीतर चिखलात अडकून बसणार आहे. आतून पुढे कशी वाटचाल करावयाची ते पुढील भागात पाहू.
- प्रताप चिपळूणकर
कृषीतज्ञ, कोल्हापूर
ऊस शेतीतील ज्वलंत प्रश्न (भाग-१): Us Sheti : परवडत नाही, म्हणून ऊसशेती कशी सोडणार? काय म्हणता आहेत तज्ञ, वाचा सविस्तर