खरीप पिकाची पेरणी लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य असून, सर्वच हंगामात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सूर्यफूल पेरणीची शिफारस केली आहे.
सूर्यफूल पिकावर सूर्याच्या तीव्रतेचा परिणाम होत नाही, त्यामुळे हे पीक कोणत्याही हंगामात तसेच कोणत्याही कालावधीत घेता येते.
सूर्यफुल हे एक बहुगुणी, कमी कालावधीत व कमी पाण्यावर येणारे पीक असून, पावसाचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करणारे आहे. पाऊस कमी पडल्यास ज्वारी पिकाला पर्यायी पीक म्हणून या पिकाची लागवड करण्यात येते.
तिन्ही हंगामात येणारे पीक
यासाठी खरीपमध्ये -जुलैचा पहिला पंधरवडा, रब्बीत ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, उन्हाळी हंगामात जानेवारीचा शेवटचा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा याप्रमाणे पेरणी करता येत असल्याची शिफारस आहे.
आंतरपीक म्हणून आले पुढे
महाराष्ट्र, ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात धान पीक काढणी झाल्यानंतर या पिकाची लागवड करतात. रागी, तूर, भुईमूग, सोयाबीन, एरंडी, तीळ, मूग, उडिद या पिकात भारतातील विविध भागांत आंतरपीक म्हणून या पिकाची लागवड केली जात आहे.
३६ टक्के अधिक उत्पादनात भर
मराठवाडा व विदर्भात सूर्यफूल अधिक सोयाबीन या आंतरपीक पद्धतीने हमखास उत्पादन घेता येते. भुईमूग अधिक सूर्यफूल या पीक पद्धतीमुळे सरासरी ३६ टक्के उत्पादनात भर पडत असून, तूर व सूर्यफूल या पीकपद्धतीमुळे निव्वळ पिकापेक्षा २३ टक्के उत्पादनात भर पडू शकते, असा निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन केंद्र विभागप्रमुख डॉ. संतोष गहूकर, डॉ. भारत फरकाडे, डॉ. प्रशांत माने, डॉ. मंजुषा गायकवाड या कृषीतज्ज्ञांनी काढला असून, आंतरपीक म्हणून शिफारशी केली आहे.
हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म