Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suru Us Lagwad : सुरु ऊस लागवडीपूर्वी जमीन मशागत व सेंद्रीय अन्नद्रव्यांचा वापर कसा करावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:18 IST

महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे.

महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे.

तसेच सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड तंत्र, अन्नद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन व खत व्यवस्थापन तंत्राचा वापर, तण नियंत्रण व यांत्रिकीकरण आणि पीक संरक्षण या तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन निश्चित मिळू शकेल.

जमीन मशागत व सेंद्रीय अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

  • सुरू उसाचा कालावधी १२ महिने व त्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त खोडवे घेण्यासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी.
  • ऊस लागवडीपूर्वी माती तपासणी करून अहवालानुसार खताचे नियोजन करावे.
  • उसाची मुळे १ ते १.५ मीटर खोलीपर्यंत जात असल्याने खोल नांगरट करणे गरजेचे आहे.
  • भारी जमिनीतील १.५ ते २ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी ५ फूट अंतरावर उताराच्या दिशेने मोल नांगराने नांगरट करावी.
  • त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि मुळे खोल गेल्याने ऊस पडण्याचा धोका कमी होतो.
  • उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमीन सेंद्रिय खतांनी समृद्ध करावी.
  • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ ते ०.६ टक्क्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • ऊस लागण केल्यानंतर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कायम राखण्यासाठी ठिबक सिंचन, पाचटाचा वापर, आंतरपिके आणि आंतरमशागत या तंत्राचा वापर करावा.
  • सुरू उसाला हेक्टरी १० टन व सऱ्या पाडल्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत जमिनीत मिसळून द्यावे किंवा ताग, धैंचा जमिनीत गाडावा. कारखान्याचे प्रेसमड कंपोस्ट उपलब्ध असल्यास हेक्टरी ६ टन चोपण जमिनीत टाकावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये द्यावे.
  • हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सरीमध्ये मेटारायझीयम अॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना हे जैविक बुरशीनाशक हेक्टरी २० ते २५ किलो १२५ किलो शेण खतातून मिसळावे.

अधिक वाचा: Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतीशेतकरीलागवड, मशागतसेंद्रिय खतखतेसेंद्रिय शेती