सुरू ऊसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. सुरू उसाला हेक्टरी १० टन व सऱ्या पाडल्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत जमिनीत मिसळून द्यावे किंवा ताग, धैंचा जमिनीत गाडावा.
कारखान्याचे प्रेसमड कंपोस्ट उपलब्ध असल्यास हेक्टरी ६ टन चोपण जमिनीत टाकावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये द्यावे.
हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सरीमध्ये मेटारायझीयम अॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना हे जैविक बुरशीनाशक हेक्टरी २० ते २५ किलो १२५ किलो शेण खतातून मिसळावा.
सुरू हंगामासाठी उसाचे वाणसुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी खालील वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे.को.८६०३२ (नीरा)को.एम.०२६५ (फुले २६५)एम.एस.१०००१ (फुले १०००१)को.९४०१२ (फुले सावित्री)को.सी.६७१ (वसंत-१)को.०९०५७को.एम.११०८२पीडीएन १५०१२ या जातींची निवड करावी.
बेणे प्रक्रिया- बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी बेणे लागणीपूर्वी १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कार्बेन्डॅझिमची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया करावी.- त्यानंतर हेक्टरी १० किलो अॅसेटोबॅक्टर + १.२५ किलो पी.एस.बी. १०० लिटर पाण्यात ३० मिनिटे जीवाणू बीजप्रक्रिया करावी. यामुळे नत्रखतामध्ये ५०% ची तर स्फुरदखतामध्ये २५% ची बचत करता येते.
अधिक वाचा: सेंद्रिय खत जमिनीच्या बाहेर कुजवून जमिनीत टाकणे योग्य की आयोग्य; वाचा सविस्तर