मोठ्या प्रमाणात सूर्यफूल या पिकाची लागवड करून तेलबियामध्ये स्वावलंबन आणणे तसेच आरोग्यदायी अशा सूर्यफूल तेलाची उपलब्धता व वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी.
सूर्यफूल पिकाची प्रमुख वैशिष्ट्ये
१) सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसल्यामुळे वर्षातील खरीप, रब्बी आणि उन्हाळा अशा तीनही हंगामात घेता येते.
२) हे पीक हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकते. म्हणून दुष्काळी भागातही चांगले येते.
३) कमी कलावधीत (८५ ते ९० दिवस) तयार होते.
४) तेलाचे प्रमाण अधिक (३५ ते ४० टक्के) असल्यामुळे थोड्या क्षेत्रात कमी कालावधीत या पिकापासून जास्त तेल मिळू शकते.
५) चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकापेक्षा किफायतशीर, काढणी मळणी सुलभ, कमी खर्चात येणारे सूर्यफूल पीक आहे.
६) सूर्यफूलच्या सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती नसते म्हणून करडईनंतर सूर्यफूल तेल हृदय रोग्यास खाण्यासाठी योग्य.
हवामान
सूर्यफूल या पिकाच्या वाढीसाठी २० ते २९ अंश सें.ग्रे. तापमान लागते. सूर्यफूल जरी वर्षातील सर्व हंगामात येत असले तरी फुलोऱ्याच्या अवस्थेत ४० अंश सें.ग्रे. पेक्षा जास्त तापमान, मोठा अगर रिमझिम पाऊस याचा दाणे भरण्यावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या कालावधीत हे पीक पावसात सापडणार नाही अशा रितीने पेरणी करावी.
जमीन
सूर्यफूल हे पिकाच्या किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. काहीशा चोपण जमिनीत देखील हे पीक येते. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामु ६.५ ते ८.५ या पिकासाठी योग्य आहे.
पूर्व मशागत
जमिनीची खोल नांगरणी करावी व कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत ५-६ टन शेणखत किंवा कंपोष्ट खत (उपलब्ध असल्यास) द्यावे.
अधिक वाचा: Suryful Lagvad : रब्बी सुर्यफुल लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड कराल वाचा सविस्तर
बियाणे
लागवडीसाठी सूर्यफुलाचे सुधारीत / संकरीत वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे. पेरणीसाठी सुधारीत वाणाचे ७ ते ८ किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
बिजप्रक्रिया
- बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रॅम बावीस्टीन/किलो किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो लावावे. केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी अप्रोन ३५ एस.डी.६ ग्रॅम/किलो प्रमाणे लावावे.
- तसेच विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड ७० डब्लु एस. ५ ग्रॅम/किलो याप्रमाणे बिजप्रकिया करावी. त्यानंतर अॅझेटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम/किलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच २५ ग्रॅम / किलो बियाणे प्रमाणे पी.एस.बी. या स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.
पेरणी
सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसले तरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणे महत्वाचे आहे. रब्बी पिकाची पेरणी सप्टेंबरचा पहिला पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
पेरणी कशी करावी?
कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. पेरणी करताना मध्यम ते खोल जमिनीसाठी दोन ओळीतील अंतर ४५ से.मी. ठेवावे तर भारी जमिनीसाठी दोन ओळीतील अंतर ६० से.मी. ठेवावे आणि दोन झाडातील अंतर ३० सेमी. राहील अशा रीतीने पेरणी करावी.