उत्तम निचऱ्याची व गाळाची सुपीक जमीन या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचे प्रमाण मात्र कमी असावे. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकाला चांगले मानवते. नारळ बागेत केळीची आंतरलागवड फायदेशीर ठरत आहे.
केळीच्या जाती- केळीच्या बसराई, ग्रँडनैन, श्रीमंती, हरिसाल, कोकण सफेद वेलची, मुठेळी, राजेळी या प्रमुख जाती आहेत.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने २००८ साली उंच वाढणारी केळीची जात प्रसारित केली आहे. सालीचा रंग पिवळसर असून, गर पांढरा आहे. घडाचे वजन १२ ते १५ किलो असून, घडात सरासरी १५६ केळी येतात. नारळ, सुपारी बागेत आंतरपीक म्हणून लावण्यासही उपयुक्त जात आहे.
लागवड- केळीची लागवड जोराचा पाऊस ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये करावी.- लागवडीसाठी योग्य अंतरावर ४५ बाय ४५ बाय ४५ सेंटीमीटर आकाराचे खड्डे खणावेत.- किनारपट्टीच्या भागामध्ये लाल केळीसारख्या उंच वाढणाऱ्या जातींसाठी ३ बाय ३ मीटर अंतर ठेवावे.- हरिसाल, श्रीमंती, लाल वेलची, सफेद वेलची यासारख्या मध्यम वाढणाऱ्या जातींसाठी २.५ बाय २.५ मीटर अंतर ठेवावे.- केळीच्या लागवडीसाठी निरोगी, जोमदार व जास्त उत्पन्न देणाऱ्या झाडांचे मोनवे वापरावेत.- मोनवे ५०० ते ८०० ग्रॅम वजनाचे असावेत. मोनव्यांच्या पानांचा आकार तलवारीप्रमाणे लांबट व अरुंद असावा.- साधारणपणे २० ते २५ सेंटीमीटर खोल खड्ड्यात मोनवे लावावेत.- ऊती संवर्धनाने तयार केलेल्या निरोगी रोपांपासूनही लागवड करता येते.
आंतरमशागत- लागवडीच्या सुरुवातीच्या काळात बागेतील तण काढून अधूनमधून खोदाई करावी आणि केळीच्या झाडांना भर द्यावी.- केळीची रोगट व वाळलेली पाने नियमितपणे कापून टाकावीत.- त्याचप्रमाणे झाड वाढत असताना त्यांच्या बुंध्यापासून अनेक मोनवे येत असतात.- असे मोनवे जमिनीलगत कापून काढले पाहिजेत किंवा मोनवे कापून त्यातील गाभ्यात चमचाभर रॉकेल ओतावे, म्हणजे मोनवे मरतात.- या क्रियेमुळे मातृवृक्ष जोमाने वाढतो आणि केळीचा घड मोठा होतो.- मात्र मातृवृक्ष फुलावर आल्यावर जोमाने वाढणारा एक मोनवा ठेवावा म्हणजे मातृवृक्षाचा घड काढल्यानंतर पुढे पीक लवकर घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो.- दुसरा मोनवा केळीचा घड तयार झाल्यावर ठेवावा.
काढणी व उत्पन्न- केळी लागवडीपासून २७० ते २८० दिवसांत केळीला फलधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर ९० ते ११० दिवसांत घड काढण्यास तयार होतात.- फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळांना गोलाई येणे ही घड काढणीसाठी योग्य झाल्याची लक्षणे आहेत.- घडाचा दांडा लांब राहील, अशा पद्धतीने घड कापावा.- घड कापल्यावर त्याचा चीक फळावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण त्यामुळे फळांवर डाग पडतात.- घड कापल्यानंतर मातृवृक्ष लगेच कापावा. केळीचे हेक्टरी २५ ते ३५ टन उत्पन्न जातीपरत्वे मिळते. घडाच्या वजनाने झाड वाकू नये, यासाठी त्याला आधार द्यावा.
अधिक वाचा: कोकण विद्यापीठाच्या १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ह्या भात वाणाला शेतकऱ्यांची पसंती