यावर्षी चांगला पाऊस पडेल, या आशेने बळीराजाने तेर, धाराशिव परिसरात खरीप हंगामाची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केल्या. परंतु, जुलै महिना सुरू झाला तरीही पेरणी पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरणी रखडली असून, यंदा पेरणी होती की नाही या विवंचनेत शेतकरी आहे. त्यामुळे तेर परिसरातील काही शेतकरी उपलब्ध पाण्यावर कोथिंबीर लागवड करताना दिसत आहेत.
तेर परिसरात खरीप हंगामात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन लागवड करण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे करून घेतली. परंतु, जुलै महिना सुरू झाला तरी एकही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे.
केवळ ३५ ते ४० दिवसांत उत्पादन
कोथिंबीर लागवड केल्यापासून अवघ्या ३५ ते ४० दिवसात काढणीसाठी येते. एक एकर कोथिंबीर पेरणीसाठी साधारणपणे ३० किलो बियाणे लागते. स्वत, फवारणी, खुरपणीसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. यानंतर बाजारात चांगला भाव मिळाल्यास किमान दीड ते दोन लाख रुपये हातात पडतात.
काही शेतकरी उपलब्ध पाणी साठ्यावर व कमी कालावधी अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथिंबीरची लागवड मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. सध्या कोथिंबीरला बाजारात चांगला भाव मिळत असून, यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत असल्याने याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.