उन्हाळी हंगामात उष्ण तापमान असल्याने भाजीपाला पिकांचे पाणी व्यवस्थापन करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे.
पाण्याचे व्यवस्थापन करताना साधारणतः जमिनीचा मगदूर, पिकांची वाढीची अवस्था या गोष्टींचा विचार करुन नियोजन करावे.
उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर केल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते.
तसेच प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व पाण्याची बचत करता येते. विशेषतः फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
पाणी शक्यतो सकाळी, संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी द्यावे. (भर उन्हात पाणी देणे टाळावे).
उन्हाळी भाजीपाला पिकात प्लास्टिक आच्छादन कसे फायदेशीर
१) उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते अशा वेळी आच्छादनामुळे शेतात झाडांजवळील शेत जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवता येतो.
२) त्यामुळे पाण्याची बचत व उत्पन्न वाढविण्यास मदत होते.
३) ओलावा टिकून राहिल्यामुळे २५ ते ३० टक्के पाण्याची बचत होते.
४) वायुंचे आदान-प्रदान चांगल्या पध्दतीने होऊन मुळांच्या सदृढ वाढीसाठी माती सशक्त होते.
५) बीज उगवणक्षमतेत वाढ होते.
६) प्लास्टिक आच्छादनामुळे कार्बनडायऑक्साईड वायुचे प्रमाण वाढते व प्रकाश संश्लेषणाला मदत होते.
७) गादीवाफ्यावर पाणी साचून राहत नाही व रोपांची वाढ व्यवस्थित होते.
८) आंतरमशागतीची कामे कमी होतात व खर्चात बचत होते.
९) भाजीपाला सडण्याचे प्रमाण कमी होते.
१०) वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कलिंगड, ढेमसे आणि खरबुज तसेच मिरची, वांगी, टोमॅटो या पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करतात.
११) यामध्ये पॉलिथिन मल्च, गवत, पालापाचोळा इ. वापरता येते. त्यामुळे फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही, खराब होत नाहीत.
१२) शिवाय जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते आणि तणांचा बंदोबस्त होतो.
अधिक वाचा: Vangi Shned Ali : वांग्यातील शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय