माजलगाव तालुक्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. चार महिन्यांपूर्वी टकारवाडी येथील फाटे कुटुंबीयांनी प्रथमच रेशीम कोशांपासून हार बनवायला सुरुवात केली होती. या हाराला गणेशोत्सव व दिवाळीत चांगली मागणी होती. त्यानंतर परळी येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी रेशीमचेच हार वापरण्यात येणार आहे.
तालुक्यातील टकारवाडी येथील शेतकरी शिवराज फाटे यांनी २०११ साली प्रथमच रेशीम शेतीची संकल्पना आणली. त्यांनी रेशीम शेती करून इतरांना मार्गदर्शन केले. फाटे यांची शेती पत्नी छाया पाहतात. चार महिन्यांपूर्वी प्रियांका शिवराज फाटे हिने रेशीम कोशांपासून हार बनवण्याची सुरुवात केली. तिने ही बाब सोलापूर येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांच्या कानावर घातली. त्यांनी प्रोत्साहन देत हार बनवण्यासाठी सहकार्य केले. गणेशोत्सवाच्या काळात पुणे, मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर यासह आदी शहरात हारांना चांगला भाव मिळाला होता.
रेशीमचा पूरक व्यवसायवजनाला हलके व आकर्षित करणाऱ्या हारांची सत्कार, समारंभासाठी मागणी वाढली आहे. मंगळवारी परळी येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी रेशीमच्या हारांची मागणी केली आहे. यामुळे मागील पाच दिवसांपासून फाटे कुटुंबीय बनवण्यात व्यस्त होते.
मुलीच्या संकल्पनेतून हार बनवणे सुरू केले. या हाराला चांगली मागणी मिळत आहे. यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली. - शिवराज फाटे, रेशीम उत्पादक
खराब रेशीम कोषांना कमी भाव मिळतो. अशा कोषांपासून हार बनवून चांगले उत्पन्न मिळविता येते. यामुळे टाकाऊ मालापासून चांगले उत्पन्न व रोजगार निर्मिती झाली. - शंकर वराट, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, बीड