Join us

अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 3:00 PM

हरवलेल्या या टोमॅटोचं रहस्य उलगडलं आहे..

अंतराळात टोमॅटो हरवलाय? कसं शक्य आहे! अशी कदाचित तुमची प्रतिक्रीया येईल. पण हे खरंय.. अंतराळात आता शेती केली जाऊ लागलीये हे तुम्हाला माहीत आहेच. पण अंतराळात टोमॅटो हरवल्याचा प्रकार काय? जाणून घेऊया..

काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये उगवण्यात आलेला एक टोमॅटो चक्क गायब झाला होता. या घटनेने सर्वांची झोप उडाली होती. मात्र, हरवलेला टोमॅटो तब्बल आठ महिन्यांनी सापडला आहे. हा टोमॅटो कोण्या एलियनने खाल्ला नव्हता, तर तो स्पेस स्टेशनमध्येच लपला होता.

स्पेस स्टेशनमध्ये तैनात असलेले अंतराळवीर फ्रैंक रुबियो यांनी तेथे टोमॅटो उगविले होते. ते कापत असताना एक टोमॅटो हरवला. स्वतः रुबियो यांनी किंवा एलियन्सने तो खाल्ला, असे विनोदात बोलण्यात आले. मात्र तो टोमॅटो गेला कुठे, या प्रश्नाने शास्त्रज्ञांना भंडावून सोडले होते. अखेर शास्त्रज्ञांनी या टोमॅटोचे रहस्य आता उलगडले आहे.

शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा?

प्रयोगाचा भाग होता टोमॅटो

फ्रैंक रुबियो ३७१ दिवस स्पेस स्टेशनवर होते. चंद्र आणि मंगळावर कशा पद्धतीने झाडे उगविता येतील, हे जाणून घेण्यासाठी स्पेस स्टेशनमध्ये प्रयोग करण्यात आला होता. टोमॅटो हरवल्यामुळे रुबियो यांची त्यांच्या सहकाऱ्यांकडून बरीच खिल्ली उडविण्यात आली होती. 

पाच भाज्या उगविल्या

स्पेस स्टेशनमध्ये शास्त्रज्ञांनी ५ भाज्या पिकविल्या होत्या. शेवटचा प्रयोग टोमॅटोचा होता. टोमॅटो २९ मार्चला तोडण्यात आले. सर्व अंतराळवीरांना चाचणी म्हणून टोमॅटो देण्यात आले. रुबियो यांना दिलेला टोमॅटो हरवला.

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रनासा