उत्पादन वाढविण्यासाठी भातशेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांचा चांगला व पुरेपूर वापर कसा करता येईल तसेच पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचा वापर करून आवश्यक असणारी अन्नद्रव्ये वेळेवर व योग्य प्रमाणात उपलब्ध कसे करून देता येतील याचा तांत्रिकदृष्ट्या विचार होणे गरजेचे आहे.
अन्नद्रव्यांचा वापर करीत असताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर होणेही कमप्राप्त आहे. याचबरोबर प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये नियंत्रीत पद्धतीने लागवड करुन रोपांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. तरच भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल.
हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांच्या सहकार्याने संशोधन करून छोट्या शेतकऱ्यांसाठी सोपे आणि कार्यक्षम चारसूत्री लागवड तंत्रज्ञान विकसित केले आहे.
त्यामध्ये अन्नद्रव्यांचा वापर करीत असताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर यात गिरीपुष्पाच्या झाडांच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर कसा करावा ते पाहूया.
गिरीपुष्पाच्या झाडांच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर
• शेत जमिनीची उत्पादन क्षमता दिर्घकाळ टिकवून धरण्यासाठी सेंद्रीय व रासायनिक खतांचा समतोल प्रमाणात वापर होणे ही जरूरीची बाब आहे.
• सेंद्रीय खताची उपलब्धता खूपच अपूरी आहे आणि त्यातच उपलब्ध असलेली सेंद्रीय खते नगदी पिकांसाठी वापरली जातात. छोट्या शेतकऱ्यास भात पिकासाठी त्याचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे हिरवळीचे खताचा भात शेतीमध्ये वापर हा एक पर्याय आहे.
• गिरीपुष्पाची लागवड बियांपासून तयार केलेली २ ते ४ महिन्यांची रोपे किंवा फांद्या (दोन ते चार सेंमी व्यासाच्या व ३०-१०० सेंमी लांबीच्या) आणून एक ते दीड मीटर अंतरावर भातशेताच्या बांधावर, कुंपणावर किंवा भातशेतीच्या जवळपास असलेल्या मोकळ्या किंवा घराच्या सभोवती पडीक जमिनीवर गिरीपुष्पाची झाडे लावावीत.
• ही गिरीपुष्पाची झाडे कोकणात व घाटावर सर्वसाधारणपणे २-३ वर्षात पुरेशी मोठी होतात.
• दोन ते चार झाडांपासून मिळणारा हिरवा पाला (अंदाजे ३० किलो) एका गुंठ्यास (हेक्टरी ३ टन) पुरेल.
• शेतकऱ्याने गिरिपुष्पाच्या फांद्या बुंध्यापासून ३०-४० सेंमी उंचीवर कापाव्यात आणि पावसाचा अंदाज घेऊन शेवटच्या चिखळणीपूर्वी २-३ दिवस अगोदर किंवा भात लावणीपूर्वी शेतात पसराव्यात.
• या कालावधीत फांद्यावरील पाने शेतात गळून पडतात. त्यानंतर उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी अगर अन्य शेतीच्या कामासाठी वापराव्यात आणि शेवटची चिखळणी नेहमीप्रमाणे करावी. असे केल्यास सेंद्रीय खतामार्फत हेक्टरी १२-१५ किलो नत्र मिळेल.
• या पध्दतीने गिरीपुष्पाचे हिरवळीचे खत परवडण्यासारखे आहे. कारण ते बरेच कमी खर्चाचे आहे.
• शेतकऱ्यांस दरवर्षी हिरवळीच्या खताच्या बियाण्याचा खर्च करावा लागत नाही.
• हिरवळीचे खत गाडण्यासाठी नेहमीच्या लाकडी नांगराने केलेल्या चिखळणीवर काम भागते.
• या खताचा दूसरा महत्वाचा फायदा असा की या खतांतील नत्राचा पुरवठा रासायनिक खतास पूरक ठरतो व तो हळूहळू पिकास मिळतो.
• चौथ्या सूत्राप्रमाणे युरिया ब्रिकेट खोल खोचून दिलेला नत्र लावणीनंतरच्या सुरूवातीच्या काळात भात पिकांस उपलब्ध होत नाही. नेमका त्याच कालावधीत गिरीपुष्पाचा पाला झपाट्याने कूजत असल्याने त्या पाल्यातील नत्र आणि काही प्रमाणात इतरही अन्नद्रव्ये भात पिकास उपलब्ध होतात.
• या सुरूवातीच्या कालावधीनंतर (सुमारे २ ते ३ आठवड्यानंतर) ब्रिकेट खतामधील नत्र व स्फूरद भात पिकास मिळू लागते.
• थोडक्यात भात पिकांची प्रामुख्याने नत्र व स्फूरद अन्नद्रव्यांची गरज खंड न पडता योग्य रितीने भागल्यामुळे ब्रिकेट खताची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते व पिकास सातत्याने अन्नपुरवठा झाल्याने पिकाची वाढ चांगली होते.
अधिक वाचा: ह्या खताच्या अतिवापराने पिकात होऊ शकतो रोग, किडींचा प्रादुर्भाव