Join us

पावसाचा खंड पडला; पिकांच्या वाढीसाठी "या" करा उपाय योजना. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 6:33 PM

पावसाने दडी मारल्याने अशावेळी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या. वाचा सविस्तर

सध्या खरिपातील सोयाबीन, कापसासारखी पिके, फुले आणि फळधारणेच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हलक्या जमिनी असणारे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत. 

अशावेळी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या याबद्दल सेंद्रिय शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी या काळात उपलब्ध पाणीसाठा असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेत तुषार किंवा ठिबक या सूक्ष्मसिंचन पद्धतीने संरक्षित पाणी द्यावे.

परंतु, उपलब्ध पाणी साठा नसल्यास अशा वेळी इतर उपाययोजना करणे फायदेशीर ठरणार आहे. पेरणी करताना बीबीएफ पद्धतीचा वापर केल्यास सुरुवातीला पडलेला पाऊस सऱ्यांमध्ये साठविला जाऊन पाण्याची उपलब्धता वाढते. 

उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. उशिरा झालेला पाऊस सऱ्यांमध्ये मुरविला जाऊन रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरतो. पिकामध्ये हलकी कोळपणी करून झाडांना मातीची भर द्यावी. त्यामुळे जमिनीवर पडलेल्या भेगा बुजविल्या जातात आणि ओलावा साठवून ठेवण्यास मदत होते. 

तणे, पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी पिकासोबत स्पर्धा करतात त्यामुळे पीक तणविरहित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी हलकी कोळपणी करून झाडाभोवती मातीचे आच्छादन करावे. 

तसेच पिकाच्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत गव्हाचा भुसा, तांदळाचा पेंढा, शेतात काढलेले तण यांचे जैविक आच्छादन करावे. यासोबतच हलक्या जमिनीवर पिकांची पेरणी करताना उताराला आडवी पेरणी करावी जेणेकरून पावसाचे पाणी वाहून न जाता सऱ्या धरून ठेवतील आणि जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहील.

काळ्या कसदार, भारी जमिनीवर पेरणी करताना उताराला समांतर पेरणी करावी, जेणेकरून पावसाचे जास्तीचे पाणी सहजपणे शेताबाहेर काढून देता येईल.

ह्युमिक अॅसिडची फवारणी करण्याची सूचना 

■ पावसाचा खंड पडलेल्या कालावधीत पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबते म्हणून पिकाची वाढ खुंटते.

 ■ पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी मायकोरायझा बुरशीची आळवणी किंवा संरक्षित पाण्यासोबत सोडावे.

 ■  तसेच ह्युमिक अॅसिडची फवारणी केल्याने पिकांना अन्न द्रव्यांचा पुरवठा केला जातो. 

अगदी कमी खर्चात घरगुती पातळीवर

पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी तांदूळ पाण्याचा वापर करता येतो.

 त्यासाठी दोन किलो तांदूळ पाण्यात उकळून त्यात एक किलो गूळ, १० लिटर पाण्यात मिसळून चार दिवस आंबवत ठेवावे. 

५०० ते ६०० मिली तांदूळ पाणी प्रती १५ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

पाणी साठा उपलब्ध असेल तर आशा वेळी ह्युमिक अॅसिड, मायकोरायझा बुरशी किंवा तांदूळ पाणी यापैकी जे परवडेल ते तुषार, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावे. 

बाष्प उत्सर्जन कमी करता येईल

■ पावसाच्या खंड कालावधीत बाष्प उत्सर्जन अधिक होते. त्यामुळे पिकांची पाण्याची गरज वाढते.

■ आशा वेळी अँटी-ट्रान्सपरंटचा वापर करावा. पाच टक्के केओलीनाइटची फवारणी केल्यास पानांद्वारे होणारे बाष्प उत्सर्जन कमी करता येईल.

■ अशा प्रकारे पावसाचा खंड पडलेल्या कालावधीत पीक तग धरेल.

टॅग्स :शेती क्षेत्रसेंद्रिय शेतीपाऊसशेतकरीशेती