Join us

उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2024 17:49 IST

उष्ण व दमट हवामान फणस पिकास चांगले मानवते. या पिकाची डोंगर उताराच्या जमिनीत लागवड होऊ शकते. चांगला निचरा होणाऱ्या अथवा रेताह, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीतही फणसाची वाढ चांगली होते. फणसामध्ये विशिष्ट अशा प्रसारित केलेल्या जाती नाहीत.

उष्ण व दमट हवामान फणस पिकास चांगले मानवते. या पिकाची डोंगर उताराच्या जमिनीत लागवड होऊ शकते. चांगला निचरा होणाऱ्या अथवा रेताह, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीतही फणसाची वाढ चांगली होते. फणसामध्ये विशिष्ट अशा प्रसारित केलेल्या जाती नाहीत. निसर्गात आढळणाऱ्या फणसाच्या झाडात मुख्यतः 'कापा' आणि 'बरका असे दोन प्रकार आवळतात. कापा फणसाचे गरे कोरडे, खुसखुशीत, मधुर आणि उत्तम स्वाद असणारे असतात. त्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी असते, बरक्या फणसाचे गरे रसाळ, मऊ, तंतुमय परंतु मधुर व उग्र स्वाद असणारे असतात, या जातीची फळे पिकल्यानंतर जास्त दिवस टिकत नाहीत, फणसपोळी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. भाजी करण्यासाठी लहान आकाराची कोवळी फळे वापरली जातात.

कोकण कृषी विद्यापीठाने 'कोकण प्रॉलिफिक ही फणसाची जात विकसित केली आहे, ही अधिक उत्पन्न देणारी कापा फणसाची नवीन जात कोकणासाठी प्रसारित केली आहे. दहाव्या वर्षी या जातीच्या झाडापासून ७२ ते ७५ फणस मिळतात. फणस मध्यम आकाराचे (५ ते ७ किलो वजन) असून, गरे जाड, पिवळसर पांढरट रंगाचे खुसखुशीत व उत्तम स्वाद आणि गोडीचे आहेत, एप्रिल-मे महिन्यात फळे तयार होतात, त्यामुळे त्यांना अधिक दर मिळतो. फणसांच्या फळांची काढणी लवकर करण्यासाठी ०.५ टक्के मोनोपोटॅशिअम फॉस्फेटची पहिली फवारणी फलधारणेच्या वेळी व दुसरी त्यानंतर २० दिवसांनी करावी.

अधिक वाचा: ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते?

फणसाच्या लागवडीसाठी आठ ते दहा मीटर अंतरावर एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदून ते चांगली माती, दोन घमेली शेणखत व १.५ किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि २०० ग्रॅम २ टक्के मिथिल परेथिऑन भुकटी यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत, लागवड चांगल्या कापा जातीच्या कलमापासून करावी, लागवडीनंतर बुध्याजवळ पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमांना आधार द्यावा, तसेच कलमांच्या खालून बुंध्यापासून येणारे फुटवे काढत राहावे, पूर्ण वाढलेल्या १५ वर्षाच्या झाडापासून दरवर्षी ३० ते ३५ फळे मिळतात. फळे खोडावर आणि मोठ्या फांद्यांवर लागतात. तयार झालेलीच फळे काढावीत.

खत व्यवस्थापनआवश्यक लागवड व लागवडीनंतर योग्य खताची मात्रा आवश्यक आहे. पाचव्या वर्षापासून प्रत्येक झाडास २० किलो शेणखत, १ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपरफॉस्फेट व ५०० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश द्यावे. पहिली पाच वर्षे वयानुसार खताची मात्रा देणे आवश्यक आहे, पिकलेल्या कापा फणसाच्या बियांना १२० अंश सेल्सिअस तापमानास १० टक्के (शुष्क पाण्याचा अंश) किंवा बरका फणसाच्या बियांना ९० अंश सेल्सिअस तापमानास २० टक्केपर्यंत सुकवलेल्या बियांपासून तयार केलेले सूक्ष्मकण, पोषण गुणधर्मयुक्त पीठ तयार करावे.

टॅग्स :शेतकरीफळेपीकसेंद्रिय खतखतेकोकणविद्यापीठ