पिकावरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक किटकनाशकांचा वापर केला जातो. किटकनाशके मानव, पाळीव प्राणी आणि पशूधनासाठी विषारी असू शकतात.
विषारी किटकनाशके हे फायदेशीर जीव आणि नैसर्गिक वातावरणाचे नुकसान देखील करू शकतात, म्हणून किटकनाशके वापरतांना सुरक्षितता हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो.
किटकनाशकांची फवारणी करतांना
१) फवारणी करतांना नेहमी संरक्षणात्मक किटचा वापर करावा, यामध्ये हातात संरक्षक मोजे (ग्लोव्हज), डोक्याला टोपी (कॅप), डोळ्याला चष्मा (गॉगल), शरीरावर पायघोळ (जॅकेट), चेहऱ्यावर आवरण (मास्क), पायात बूट इत्यादी गरजेचे आहे.
२) योग्य फवारणी यंत्राची निवड करावी. गळती असणारे किंवा सदोष फवारणी उपकरणे वापरू नयेत.
३) तणनाशके फवारणीसाठी स्वतंत्र फवारणी पंप वापरावीत.
४) किटकनाशकांच्या बाटल्या, डबे, पिशव्या इ. गोष्टी सोयीस्कर साधनांच्या सहाय्याने (जसे कैची, पेंचीस, बॉटल ओपनर) उघडावीत.
५) फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्य पदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेऊ नये.
६) किटकनाशकाचे द्रावण तयार करण्याकरीता स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
७) किटकनाशकाची फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करणे फायद्याचे ठरते.
८) पाऊस सुरू असताना किंवा वाऱ्याचा वेग जास्त असतांना फवारणी टाळावी.
९) फवारणी नेहमी वाऱ्याचा दिशेने करावी. कुठल्याही परिस्थितीत वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करणे टाळावे.
१०) फवारणी संचातून सर्वेसाधारण मध्यम आकाराचे (५० ते ३५० मायक्रॉन) थेंब पडतील अशा प्रकारचे नोझल अॅडजेस्ट करावे.
११) नोझलममध्ये अडकलेला कचरा तोंडाने फुंकुन साफ करू नये. त्याऐवजी खराब झालेला टूथब्रशचा, बारीक तार यांचा वापरा करावा.
१२) किटकनाशके वापरतांना खाद्य पदार्थ खाणे-पिणे व धूम्रपान करणे टाळावे.
१३) पिक फुलोऱ्यात असतांना फवारणी करणे टाळावे, जेणे करुन मित्र किडीचे संरक्षण होईल.
१४) किटकनाशकाचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी.
१५) शरीरावर जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करणे कटाक्षाने टाळावे.
फवारणी झाल्यानंतर
१) फवारणी झाल्यानंतर विशिष्ट काळापर्यंत (प्रतिक्षा कालावधी) फळे, भाज्या खाण्यासाठी वापरू नये व फवारणी झालेल्या क्षेत्रावर गुरे-ढोरे चरणार नाही याची काळजी घ्यावी.
२) फवारणी आटोपल्यावर फवारणीचे साहित्य नदी, कालवे किंवा तलावाच्या पाण्यात धूवु नयेत जेणेकरुन पाण्याचे प्रदुषण टाळता येईल.
३) किटकनाशकांच्या वापरानंतर रिकामे डबे, पिशव्या काठीने ठेचून पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर जमिनीत गाडले जावेत व उरलेले किटकनाशके कुलुपबंद अशा सुरक्षित जागी ठेवावेत.
४) फवारणी झाल्यानंतर यंत्रातील औषधी पूर्णपणे बाहेर काढून यंत्र स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या जागी ठेवावे.
५) फवारणी आटोपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावेत.