महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू ह्या राज्यांत चिकूची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चिकू हे अतिशय काटक पीक असून महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या जमिनींत येऊ शकते.
चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते.
जमीन व हवामान
मध्यम प्रतीच्या, उत्तम व बारमाही पाण्याची सोय असलेल्या जमिनीत चिकू लागवड करता येते. भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या या दोन्ही हवामानात चिकूची वाढ चांगली होते.
लागवड
लागवडीपासून तीन वर्षे कलमावरील फुले खुडून काढावीत. कलमांची पूर्ण वाढ होण्यास आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या सहा वर्षाच्या कालावधीत चिकूच्या लागवडीमध्ये आंतरपिके म्हणून भाजीपाला, अल्पायुषी फळझाडे, फुलझाडे, द्विदल धान्य घेता येतात.
चिकूच्या सुधारित जाती
१) कालीपत्ती
या जातीच्या झाडाची पाने गर्द हिरव्या रंगाची व फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गर गोड असतो. फळे भरपूर लागतात. या जातीच्या फळांना चांगला दरही मिळतो.
२) क्रिकेटबॉल
या जातीपासून मोठी गोलाकार फळे मिळतात. गर कणीदार असतो. मात्र गोडी कमी असून, फळे चवीला कमी असतात. फळे भरपूर लागतात.
३) छत्री
या झाडाच्या फांद्यांची ठेवण छत्रीसारखी असते. पाने फिकट हिरव्या रंगाची असतात. फळाचा आकार कालीपत्तीच्या फळांप्रमाणे असतो. परंतु गोडी असते.
खत व्यवस्थापन
- पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, ३०० ग्रॅम युरिया, ९०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन हप्त्यात सम प्रमाणात विभागून देणे आवश्यक आहे.
- पहिला हप्ता ऑगस्टमध्ये आणि दुसरा हप्ता जानेवारीमध्ये द्यावा.
- दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाच्या दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट याप्रमाणे खताचे प्रमाण २० वर्षापर्यंत वाढवित न्यावे.
- त्यानंतर दरवर्षी २० घमेले शेणखत, सहा किलो युरिया, १८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व सहा किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते चरातून बांगडी पद्धतीने प्रति झाडास द्यावीत.
पाणी व्यवस्थापन
हिवाळ्यात आठ व उन्हाळ्यात पाच दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेले, परंतु पाणी साठून राहणार नाही, अशी योजना करावी. तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
छाटणी
जुन्या व घनदाट चिकूच्या बागेमधून अधिक उत्पन्नासाठी ऑक्टोबरमध्ये मधल्या मुख्य फांदीची छाटणी व विरळणी करावी.
कीड नियंत्रण उपाय
कीडींचे नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना गरजेची आहे. बागेची स्वच्छता राखून झाडांची योग्य छाटणी करून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येईल असे पाहावे. बागेत निळ्या रंगाचा प्रकाश सापळा लावावा. कीडग्रस्त तसेच गळलेली सर्व फळे पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावा. एक महिन्याच्या फरकाने कीटकनाशके आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणीपूर्वी फळे काढून घ्यावीत.