रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. परिणामी, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहे.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांकडे पशुधन होते. प्रत्येकाच्या घरी एखादी दुसरी दुभती गाय, म्हैस असायची. शेतमजूर असेल तर एखादी शेळी तरी असायचीच, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला घरचे शेणखत मिळायचे किंवा काही शेतकरी शेणखत विकत घ्यायचे. आता पशुधन कमी होत असल्याने शेणखत मिळणे अवघड झाले आहे.
मिळाले तर विकतचे शेणखत न परवडणारे त्यामुळे रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करूनच शेतकरीशेती कसताना दिसून येत आहेत. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.
शेणखताचा तुटवडा, सेंद्रिय खतांची अनुपलब्धता आदी कारणांमुळे नैसर्गिक शेती कसणे शेतकऱ्यांना शक्य नाही. तरीही काही मोजकेच शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खत, लेंडीखत आदी सेंद्रिय खतांचा वापर करतात.
शेतकरी शेतात प्रत्येकी तीन वर्षांनंतर शेणखताचा वापर करताना दिसत आहेत. काही शेतकरी शेणखताचे दर वाढत असल्याने सध्या ग्रामीण भागात पशुधन घेत आहेत.
जमिनीतील पोषक तत्त्वे होताहेत गायब
आताच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत आहे. त्यामुळे जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती नापीक होण्याची शक्यता बळावली आहे.
पारावरची चर्चा
- पूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते. वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते.
- खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाने आक्रमण केले की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते. मात्र, कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली.
- आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. तत्त्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्त्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती.
- पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला व पीक कसदार येत होते.
- त्यामुळे मनुष्याला पौष्टिक अन्न मिळत होते. शेणखतामुळे शेतात उत्पन्न भरपूर येत होते.
- सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोस न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचे दिसून येते. परिणामी, अधिक उत्पनाचा दुसरा मार्ग नसल्याने शेतकरी त्यांचा अतिवापर करतात.