Join us

हापूसच्या फळांचे संरक्षण, आकार व वजन वाढविण्यासाठी करा हा एकदम सोपा स्वस्त उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 17:26 IST

उष्मा वाढल्याने आंबा लवकर तयार होत आहे. मात्र, प्रखर उन्हामुळे आंब्यावर काळे डागही पडत आहेत. हापूसचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच फळांचा आकार व वजन वाढून डागविरहित फळे मिळवण्यासाठी बागायतदारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

उष्मा वाढल्याने आंबा लवकर तयार होत आहे. मात्र, प्रखर उन्हामुळे आंब्यावर काळे डागही पडत आहेत. हापूसचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच फळांचा आकार व वजन वाढून डागविरहित फळे मिळवण्यासाठी बागायतदारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना अवलंबण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार २५ बाय २० सेंटीमीटर आकाराची कागदी किंवा वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचे आवरण फळांना घालावे. आवरण घालताना फळांच्या देठाकडे इजा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

फळांची गळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड दिले पाहिजे. आंब्यावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फवारण्या करणे आवश्यक आहे. फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी बागेतील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळा प्रति एकरी दोन या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारणतः २ते ३ मीटर उंचीवर राहील असे टांगावे. तयार आंबा फळाची काढणी देठासह (८० ते ८५ टक्के) पक्वतेला करावी.

उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने फळांची काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ वाजल्यानंतर करावी. उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर काढणी करावी. फळे काढल्यानंतर लगेचच सावलीत ठेवावीत. आंबा फळांची वाहतूकही रात्रीच्या वेळी करावी, असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :आंबातापमानहवामानकीड व रोग नियंत्रणशेतकरीकोकणविद्यापीठशेती