मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असून, मोसंबीवर कोळी किडिंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र असून, येथे संत्र्यांवर कोळी कीड दिसून येत आहे. अन्य जिल्ह्यातही लिंबूवर्गीय बागेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य त्या उपाययोजना कराव्यातमोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.
ओळखकोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते. प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिकट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात.
प्रादुर्भावाची लक्षणे- कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात.- परिणामी, पानावर पांढरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो.- फळावरील नुकसान तीव्र स्वरुपाचे असते. खरबटलेल्या जागी पेशींची वाढ खुटते. - तपकिरी लालसर किवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात, याला शेतकरी 'लाल्या' म्हणून ओळखतात.- जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात.- आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते.
व्यवस्थापन१) कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो.२) प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. वेळोवेळी बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावेत.३) पाण्याचा ताण पडू देऊ नये.४) निंबोळी अर्क (५%) किंवा अॅझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.५) रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि.लि. किवा डायफेनथीयूरोन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
कृषि कीटकशास्त्र विभागवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी