कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराचे बांधावर घेण्यात येते. हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किवा मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते.
आवश्यक जमीन व पूर्वमशागत
- तूर पिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी, मुळे खोलवर जाऊ शकणारी, भुसभुशीत जमीन मानवते.
- खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
- पहिले पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापशावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात चांगली तापू द्यावी.
- त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढवण्यास मदत होते.
- नांगरणीनंतर कुळवणी करून ढेकळे फोडावीत व फळी मारून जमीन समपातळीत आणावी.
वाण
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीचे चार सुधारीत वाण विकसित केले आहेत.
- त्यामध्ये कोकण तूर १, आय.सी.पी.एल. ८७, टी २१, विपुला या जाती १२० ते १५५ दिवसात तयार होतात.
- हेक्टरी १० ते १८ क्विंटल उत्पादन देत आहेत.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्व प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम चोळावे व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.
पेरणी कशी करावी?
- तूर पिकाचा कालावधी तुलनात्मक दृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच लवकरात लवकर करावी.
- कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे न होता उत्पादनात घट येते.
- सलग पीक घ्यायचे असल्यास हलक्या जमिनीत ६० सेमी बाय ७५ सेमी तर मध्यम ते भारी जमिनीत ७५ ते ९० सेमी अंतरावर पेरणी करावी.
- अंतरानुसार हेक्टरी १५ ते २० किलो लागते.
खत
तुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फूरद आणि आवश्यकतेनुसार ५० किलो पालाश पेरणीचे वेळी बियाण्याच्या खाली मातीत चांगले मिसळून द्यावे.
आंतरमशागत
- पेरणीनंतर १० दिवसात नांगे भरावेत. तसेच आवश्यकता असल्यास विरळणी करावी.
- पिकात १५ ते २० दिवसानंतर कोळपणी करावी.
- तसेच एक ते दोन बेणण्या करून पीक ४५ ते ६० दिवसांचे होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.
- तूर खरीप हंगामातील पीक असल्याने ते पावसावर चांगले वाढते, पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
पीक संरक्षण
- पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगावरील माशी आणि काळे सोंडे या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते.
- किडींचे नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापनाने करावे.
- अगोदरच्या पिकानंतर खोल नांगरणी, निंबोळी पेंड, सेंद्रीय खतांचा वापर, पिकांची फेरपालट, आंतर/मिश्रपिके आणि रासायनिक उपायांचा एकात्मिक वापर केल्यास किडींचे प्रमाण कमी राहते.