Horse Gram Cultivation कोकणात प्रामुख्याने वाल, मूग, चवळी, उडीद, कुळीथ, तूर, मटकी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. खरीप हंगामातील भातकापणी झाल्यानंतर जमिनीतील ओलाव्यावर कुळीथ पेरणी केली जाते.
९० ते १२० दिवसांत तयार होणारे हे पीक असून, कमी पाण्यावर येणारे हे पीक फायदेशीर आहे. कुळिथाला बाजारात दरही चांगला मिळतो. शिवाय या पिकासाठी विशेष परिश्रमाची आवश्यकता भासत नाही.
आवश्यक जमीन व पूर्वमशागत
कुळीथ पिकासाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन मानवते. जमिनीची उभी, आडवी नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावीत. फळी मारून जमीन सपाट करावी.
वाण
- कोकण कृषी विद्यापीठाने कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या कुळीथ पिकाच्या सुधारित जातींची शिफारस केली आहे. त्यामुळे 'दापोली एक' हे वाण ९० ते १०० दिवसांत तयार होते. शिवाय हेक्टरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते.
- सीना हे वाण ११५ ते १२० दिवसांत तयार होते. हेक्टरी ८ ते ९ टन, तर माण हे वाण १०० ते १०५ दिवसांत तयार होते व ६ ते ७ क्विंटल हेक्टरी उत्पादन देते.
- पारंपरिक वाणाचा वापर सर्रास केला जात असला तरी प्रगतशील शेतकरी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा वापर लागवडीसाठी करत आहेत.
पेरणी कशी कराल?
कुळिथाची पेरणी दि. १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरपर्यंत करावी. कुळिथाची पेरणी ओळीत ३० सेंटिमीटर अंतर ठेवून करावी, हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे पेरणीसाठी पुरते.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी एक किलोग्रॅम बियाण्यास २.५ ग्रॅम प्रमाणे थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर पेरणीपूर्वी रायझोबियम २५ ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून लगेच पेरणी करावी.
आंतरमशागत
कुळीथ पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पीक फुलोऱ्यात न येता फक्त शाखीय वाढ होत राहते. यासाठी पाण्याचा अतिवापर टाळावा. या पिकाला एक वेळ कोळपणी १५ ते २० दिवसांनी व आवश्यकतेनुसार ४० दिवसांनी बेणणी करावी. त्यानंतर पिकाची वाढ दाट झाल्यामुळे तणांच्या वाढीला आळा बसतो.
खत व पाणी व्यवस्थापन
पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश या अन्नद्रव्याची मात्रा ओळीत मातीमध्ये चांगली मिसळून द्यावी. अंगओलीत असल्यास कुळिथाला पाण्याची गरज नसते; परंतु ओलावा कमी असलेल्या पिकाला फुलोऱ्यात असताना, शेंगा पोसण्याच्या अवस्थेत पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात.
काढणी
पेरणीनंतर साडेतीन महिन्यांनी ते कापणीस तयार होते. पाने वाळून गळू लागली काढणी करावी. काढणी शक्यतो सकाळीच करावी.
अधिक वाचा: हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर