यावर्षी पावसाळा लांबल्याने ऑक्टोबरअखेर पाऊस राहिल्याने जमिनीमध्ये अद्याप ओलावा आहे. ऑक्टोबरमध्ये येणारी पालवी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली आहे.
गतवर्षी फळधारणा न झालेल्या काही झाडांना थंडीमुळे मोहर प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाचवेळी काही झाडांना मोहर, तर काही झाडांना पालवी अशी संमिश्र स्थिती आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत आंबा हंगामाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यावर्षी पाऊस लांबल्याने ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. थंडीही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. उष्णता नसल्यामुळे गतवर्षी फळधारणा न झालेल्या झाडांना मोहर प्रक्रिया सुरू झाली नव्हती.
मात्र, गेल्या काही दिवसात थंडीचा जोर वाढल्यामुळे मोहर प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र, त्याचे प्रमाण किरकोळ आहे. अजूनही आंबा हंगामाबाबत काहीच सांगता येत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
पाऊस, दमट हवामान आणि थंडी यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोहर/पालवीवर होत असल्यामुळे बागायतदारांनी संरक्षणासाठी कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. किडीपासून संरक्षण केले तरच भविष्यात पीक वाचणार आहे.
अशा करा उपाययोजना
- ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
- तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था १० तुडतुडे प्रती पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास खालीलप्रमाणे फवारणी करा.
- ज्या बागामध्ये पहिली फवारणी होऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे अशा बागांमध्ये डॉ. बा.सा.को.कृ. विद्यापिठाच्या पालवी व मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पिकावर दुसरी फवारणी लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून घेण्यात यावी.
- ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.
- असे झाल्यास नियंत्रणासाठी कार्बेनडेझीम १२ टक्के + मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्राम प्रति १० ली. पाण्यात मिसळून वापरावे.
- फवारणीच्यावेळी किटकनाशक/बुरशीनाशक द्रावणामध्ये स्टीकर/स्प्रेडर सारखा चिकट पदार्थ १ मिली/१ लि. पाणी याप्रमाणात मिसळावा.