सह्याद्रीच्या टापूमध्ये अनेक प्रकारच्या Ranbhaji रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते.
रस्त्याच्या आजूबाजूला जेथे नजर फिरेल तेथे आपणास हिरव्यागार पानांचा टाकळा वाढलेला आढळून येतो. टाकळ्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वांसोबत लोहसुद्धा काही प्रमाणात असते. त्वचा रोगांमध्ये सर्वश्रेष्ठ भाजी म्हणून टाकळा या जंगली भाजीकडे पाहिले जाते. टाकळ्याचे पंचांग उदा. पाने, खोड, मूळ, फुले, बीज यांचे वेगवेगळे उपयोग आहेत.
बांबूच्या कोवळ्या पानांची भाजी, अळूची भाजी, अळंबी, अमरकंद, कर्टोली, कुलू, कुरडू, दिंडा, रानभेंडी, शतावरी वगैरे पावसाळ्यामध्ये स्थानपरत्वे वाढणाऱ्या भाज्या वेगवेगळ्या असतात. जंगलातून, डोंगरदऱ्यातून चालताना अनेकदा भारंगी दिसून येते. मोठी पाने व त्याच्या कडेवर असलेले कात्रे व मध्यभागी तुऱ्यावर असलेली निळसर वर्णाची फुले ही भारंगीला आकर्षक बनवतात.
कपाळफोडीसुद्धा पावसाळ्यामध्ये फार आढळते. त्याचप्रमाणे शेवळासुद्धा जास्त प्रमाणात आढळतो. या सर्व रानभाज्या पावसाळ्यात कोकणामध्ये आढळून येतात. सर्व रानभाज्यांचे आरोग्यदायी गुण आहेत. प्रत्येक भाजीचे गुणधर्मसुद्धा वेगवेगळे आहेत. मधुमेहासह चरबीचे विकार, वजन वाढणे, पोटाचे आजार, बद्धकोष्ठता याच्यासाठी टाकळ्याची भाजी बहुगुणी मानली जाते.
टाकळ्याच्या रसाचा वापर वेगवेगळ्या अनुपानापरत्वे यकृताच्या आजारांवर केला जातो. टाकळ्याचा रस व चिंचेचा पाला यांचा रस भूक मंद झालेल्या रुग्णांना दिल्यास अल्पावधीत भूक वाढते. अळंबी किंवा मशरुम याच्याबद्दल अनेक किस्से आढळतात. काही मंडळी अळंब्यांना मांसाहारी म्हणून खाणे टाळतात. पण अळंबी ही एक प्रकारची भाजी आहे.
अळंब्यांचे विविध प्रकारसुद्धा आढळतात. यामध्ये काही प्रकारची अळंबी ही विषारी असतात. पण या भूछत्रांमध्ये आतड्यांचा कर्करोग बरा करण्याची ताकद आहे. पेवग्याची भाजीसुद्धा बहुगुणकारी आहे. कोंलीची भाजी मधुमेही रुग्णांसाठी फार चांगली असते. रानभेंडीचे सूप अंगात ताकद येण्यासाठी घेतात. रानभेंडीचे मूळ त्वचेवरील सूज कमी करते. अमरकंद रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो.
जंगली बटाटा याला कोकणात गावल म्हणतात व हा जंगली श्वापदांचे आवडते खाद्य आहे. यामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात आढळतात. उपवासाच्या दिवशी कंदमुळाप्रमाणे याचे सेवन करतात. अळूच्या भाजीचा महिमा तर सर्वांना माहिती आहे.
वात विकारांवर अळूचा वापर चांगल्याप्रकारे केला जातो. शतावरीचा वापर टॉनिक म्हणून सर्वश्रुत आहे. सप्तधातूवर्धक म्हणून शतावरीची मुळे वापरली जातात. आयुर्वेदामधील सर्वश्रेष्ठ रसायन म्हणून शतावरीचा उल्लेख आढळतो.
कपाळफोडी, भारंगी अनेक आजारांवर फार प्राचीन काळापासून वापरली जातात. भारंगी मधुमेहासह उच्च रक्तदाब, रक्तदोष, स्त्रियांच्या आजारांवर चिकित्सेकरिता वापरली जाते. पावसाळ्यात आढळणाऱ्या अनेक रानभाज्या आरोग्यविषयक समस्यांसाठी उपयुक्त आहेत. मात्र, सर्वच रानभाज्यांचा उल्लेख येथे करणे अशक्य आहे.
डॉ. अनिलकुमार वैद्यप्रतिथयश आयुर्वेदिक चिकित्सक
अधिक वाचा: ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या