कर्जत : येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तीन वाण विकसित करण्यात यश मिळवले आहे. कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या वाणांचा समावेश आहे.
राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने त्यांना मान्यता दिल्यावर शक्रवारी २ ऑगस्ट रोजी केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही मान्यता दिली आहे. भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे आणि त्यांच्या पथकाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
विविध गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या या तिन्ही भात वाणांचे बियाणे पुढील हंगामापासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे डॉ. भरत वाघमोडे यांनी सांगितले.
असे आहेत हे वाण१) कोकण संजय- हे वाण निमगरवा जातीचे (१२५ ते १३० दिवस) आहे.- लांबट, बारीक दाण्याचा हे वाण ५० ते ५५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन देईल.- प्रमुख कीड व रोगाला मध्यम प्रतिकारक आहे.- शिजवल्यानंतर तांदळाची गुणवत्ता उत्तम आहे.
२) कर्जत १०- हे वाण गरवा (१४० ते १४५ दिवस) आहे.- यात ४५ ते ५५ २ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळू शकते.- हे वाण पाणथळ जमिनीसाठी उपयुक्त असेल.- कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आहे.- आख्ख्या तांदळाचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असून, शिजवल्यानंतर भाताची गुणवत्ता उत्तम आहे.
३) ट्रॉम्बे कोकण खारा- हे वाण निमगरवा (१२५ ते १३० दिवस) आहे.- हे लांबट, बारीक दाण्याच्या प्रकारातील असून, ४० ते ४५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन देणारे वाण आहे.- कोकण विभागातील क्षारपड जमिनीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे.- सहा ईसीपर्यंत क्षार सहन करणारे हे वाण आहे.
कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राकडून हे तिन्ही वाण विकसित करण्यात आले आहेत. केंद्राकडूनही त्यांना परवानगी मिळाली आहे. पुढील हंगामासाठी ते उपलब्ध होणार आहेत. हे वाण भात उत्पादकांसाठी वरदान ठरतील. - डॉ. रवींद्र मर्दाने, विस्तार शिक्षणशास्त्रज्ञ