गेल्या पाच-सहा वर्षापासून 'थ्रीप्स फ्लव्हस व थ्रीप्स हवाईन्सीस' या थ्रीप्सच्या प्रजातींचा प्रादुर्भाव आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे या किडींचे नियंत्रण वेळेवर करणे गरजेचे आहे. फुलकीड ही आकाराने सूक्ष्म असून, डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही.
या किडीचे प्रौढ पिवळ्या अथवा गडद चॉकलेटी रंगाचे तर पिल्ले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची असतात. या किडीचा जीवनक्रम १२ ते १५ दिवसांचा असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पाने मोहर, कोवळे दांडे आणि फळांवरील साल खरवडून त्यातून पाझरणारा रस शोषून त्यावर आपली उपजीविका करतात. कोवळ्या सालीचा भाग खरवल्यामुळे तो भाग काळा पडतो. पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवल्यासारखे दिसतात. काळे किंवा चॉकलेटी होतात. मोहर काळा पडून गळून जातो. फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साल खरवडल्यासारखी दिसते व फळांवर खाकी किवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. फळांची वाढ खुंटते व प्रतही बिघडते. लहान फळांची मोठ्या प्रमाणावर फळगळ होते. फळे खराब झाल्यामुळे अशा फळांना दर कमी मिळतो.
अधिक वाचा: आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?
या किडीचा जीवनक्रम कमी कालावधीचा असल्याने प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांची संख्या गतीने वाढून आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सिंथेटीक पायरेथ्रॉईड व इमिडाक्लोप्रिड सारख्या कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, किडीचा अल्प जीवनक्रम तसेच कीटकनाशकांच्या सततच्या वापरामुळे फुलकिडीमध्ये प्रतिकार क्षमता वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा मोहर संरक्षणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पीक संरक्षण वेळापत्रकाचा काटेकोर अवलंब करणे गरजेचे आहे.
आंबा बागांमध्ये किंवा जवळच्या काजू झाडांवरही फवारणी करणे गरजेचे आहे. कारण, फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास २.५ मिली स्पिनोसँड ४५ टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास दुसरी फवारणी थायोमि-थाक्झॉम २५ टक्के (WG) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात करावी. मोहर फुलत असल्यास फळधारणा झाली नसल्यास फवारणी टाळावी.
तुडतुड्याचा प्रादुर्भावतुडतुडे मोहरातील, कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर गळून पडतो. शिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे/फळे काळी पडतात. किडीचा प्रादुर्भाव दिसताच अॅक्साडीरॅक्टीन १ टक्का (१०,००० पीपीएम) या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किवा व्हर्टीसिलियम लिकानी या बुरशीचे बीजकण (पाच ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारावे. काळे डाग असलेली फळे ५ ग्रॅम ब्लिचिंग पावडर १० लिटर पाण्यात टाकून तयार द्रावणात धुऊन काढावी.