जमिनीचा पोत टिकवण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामुळे कन्हाड तालुक्यातील अनेक शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत.
तर रासायनिक खतांच्या अवाजवी व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता बिघडली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरत आहेत.
बैलाच्या शेतीची जागा यंत्राने घेतली आणि दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याने घरोघरी जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जमिनीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच रासायनिक खतांचा भरमसाठ वापर अलीकडे वाढल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे.
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी हिरवळीच्या खताकडे वळू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यंदा ताग, ढेंचा आदी हिरवळीची पिके घेतली असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रत्येक कुटुंबात जनावरांची संख्या कमी झालेली दिसते. त्यामुळे सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे.
शेतात वारंवार पिके घेतल्याने सेंद्रिय कर्बाची व नत्राची कमतरता दिसून येते. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके उपयुक्त ठरू लागली आहेत. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ताग व ढेंच्या या हिरवळीच्या पिकांना प्राधान्य दिले आहे.
ताग हिरवळीचे उत्तम पीक असून, सर्व प्रकारच्या जमिनीत हे वाढते. पेरणीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यात येते. त्यावेळी नांगराच्या साह्याने हे पीक जमिनीत गाडून टाकले जाते. ही प्रक्रिया रिकाम्या शेतात साधारणपणे मार्च ते मेदरम्यान पूर्ण केली जाते, त्यामुळे जून महिन्यात पेरणी करताना किंवा उसाची लागण करताना इतर खतांची गरज कमी प्रमाणात भासते.
हिरवळीच्या खताचे फायदे• प्रतिहेक्टर सुमारे ६० ते १५० किलो नत्र उपलब्ध करते.• जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवते.• मातीची पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.• मातीचा भौतिक रासायनिक व जैविक पोत सुधारण्यास मदत होते.• मातीत सेंद्रिय कर्ब वाढल्याने उपयुक्त सूक्ष्म जिवांच्या निर्मितीचे प्रमाण वाढते.• सर्वसाधारणपणे शेंगवर्गीय पिकातून बनलेले एक टन हिरवळीचे खत सुमारे तीन टन शेणखताच्या बरोबर शेणखताचा बरोबर असते.