ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी भाजीपाला हे अर्थाजनाचे एक प्रमुख साधन आहे. यासाठी भाजीपाला पिकांची योग्य निवड करुन त्याचे दर्जेदार उत्पादन घेणे महत्वाचे असते.
महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्या काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, ढेमसे, तांबडा भोपळा, कलिंगड, खरबुज इ. उन्हाळी भाजीपाला पिके घेतली जातात यात आंतरमशागतीचे कामे कशी केली जातात ते पाहूया.
विरळणी करणे
लागवडीनंतर ३-४ आठवड्यांनी अंकूर फुटून वेल वाढू लागतो. प्रत्येक ठिकाणच्या दोन जोमदार वेली ठेवून बाकीच्या काढून टाकाव्यात.
आधार देणे
वेलवर्गीय पिकांना वाढीसाठी आधाराची गरज असते. तर वेल जमिनीवर पसरु दिल्यास फळांची नासाडी होते आणि फळांचा दर्जा घसरतो. अशावेळी मंडप करुन वेल मंडपावर सोडावेत. मंडप उभारणीचे काम शक्यतो वेल १ ते १.५ फुट उंचीचे होण्याअगोदर पूर्ण करणे गरजेचे आहे.
बगलफुट काढणे
वेल वाढत असताना बगलफुट आणि तणावे काढावेत. वेल ५ फुट उंचीचा झाल्यावर बगलफुट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. म्हणजे दर्जेदार उत्पादन मिळते.
वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड केल्यापासून २०-२५ दिवसांनी वेल ताटी किंवा मंडपावर सोडण्यासाठी सुतळीच्या साहाय्याने वर चढवावेत तसेच मंडप पध्दतीमध्ये वेल मंडपावर पोहचल्यानंतर सर्व बगल फुटी काढाव्यात आणि ताटी पध्दतीमध्ये पहिल्या तारेपर्यंत वेलीवरच्या बगलफुटी काढून टाकाव्यात त्यानंतर बगलफुटी/फांद्या काढू नये.
आच्छादनाचे फायदे
आच्छादनामुळे शेतात झाडांजवळील शेत जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवता येतो. त्यामुळे पाण्याची बचत व उत्पन्न वाढविण्यास मदत होते. ओलावा टिकून राहिल्यामुळे २५ ते ३० टक्के पाण्याची बचत होते. वायुंचे आदान-प्रदान चांगल्या पध्दतीने होऊन मुळांच्या सदृढ वाढीसाठी माती सशक्त होते.
बीज उगवणक्षमतेत वाढ होते. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कलिंगड आणि खरबुज या पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करतात. त्यामध्ये पॉलिथिन मल्च, गवत, पालापाचोळा इ. वापरता येते. त्यामुळे फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही, खराब होत नाहीत शिवाय जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते आणि तणांचा बंदोबस्त होतो.
अधिक वाचा: आला उन्हाळा.. पिकांना पाणी कमी पडतंय; करा या तंत्राचा वापर वाढेल उत्पादन
खत व्यवस्थापन
वेलवर्गीय भाजीपाला पिकांना २५ टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी द्यावे. तसेच शिफारशीनुसार अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे. उरलेले नत्र लागवडीनंतर ४५-५० दिवसांनी पिकास द्यावे. त्याचबरोबर काही पाण्यात विरघळणारे खते १९:१९:१९ ५ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून २-३ फवारणी द्याव्यात. तसेच प्रत्येक तोडणीनंतर नत्राचा हप्ता द्यावा.
पाणी व्यवस्थापन
वेलवर्गीय भाज्या जरी पाण्याचा ताण सहन करु शकत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारे उत्पादन मिळविण्यासाठी वेलवर्गीय पिकांना पाण्याचे व्यवस्थापन करताना वातावरणातील तापमान, जमिनीचा मगदूर आणि पिकांची अवस्था यानुसार पाणी द्यावे. शक्यतो ८-१० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. शक्य असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पिकाला पाणी द्यावे. प्रती दिवस १ तास संच चालू ठेवावा.
संजिवकाचा वापर
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये नर आणि मादी फुले येतात. त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त आणि मादी फुलाचे प्रमाण कमी असते आणि आपणास मादी फुलापासून फळधारणा होऊन फळे मिळतात. त्यासाठी मादी फुले जास्त आणि नर फुले कमी असावे लागते त्यासाठी काही संजीवकाचा वापर करता येतो.