सतीश सांगळे
ज्वारी, बाजरीसारख्या पिकांचे कोवळे दाणे टिपण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी होते. या काळात शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे असते. पूर्वीच्या काळात शेतात बुजगावणे उभे करणे, मचाण उभारून राखण करणे, गोफण वापरून पक्ष्यांना हुसकावण्याचे प्रयत्न केले जात असत. अनेकदा फटाके फोडून पक्ष्यांना हुसकावत असत. मात्र, काळ बदलला, काळाप्रमाणे शेतकरीदेखील बदलला आहे.
आता फुलोऱ्यात आलेल्या पिकांना पक्ष्यांपासून वाचविण्यासाठी शेतकरी आधुनिक साधने वापरू लागला आहे. यामध्ये आता शेतकरी 'कलर रिबन'चा वापर करीत आहेत. शेतात ही रिबन बांधल्याने पक्षी पिकांच्या जवळ येत नाहीत, या कलर रिबन चमकतात. त्यामुळे पक्षी घाबरतात. उन्हाळी बाजरी, पावसाळी बाजरी, ज्वारीसारखी कुसाळ पिकांचे कोवळे दाणे टिपण्यासाठी हे पक्षी येतात. कोवळे दाणे हे पक्ष्यांचे आवडते खाद्य मानले जाते. मात्र, कलर रिबनमुळे जवळपास ८० टक्के पीक शेतकऱ्याच्या हाती लागते. २० टक्के पीक शेतकरी पक्ष्यांसाठी अनेकदा सोडून देतात.
तसेच शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात, अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्ष्यांना रोखण्यासाठी जुगाड शोधून काढले आहे.
अधिक वाचा: कमी कालावधीचं कमी पाण्यात येणारं उन्हाळी बाजरी पिक; कशी कराल लागवड?
साड्यांचे आच्छादन
शेतातील पिकांवर बसलेल्या पक्ष्यांना कितीही हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नाहीत. एका ठिकाणाहून उडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पिकांवर जाऊन बसतात, त्यांना पळवण्यासाठी शेतकरी पिकांमध्ये बुजगावणे उभे करणे, तसेच विविध युक्ती वापरत असतात; पण त्यानंतरही पक्षी जात नाहीत.
यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांनी द्राक्षे बागेला चारही बाजूंनी वापरात नसलेल्या साडीचे वरील बाजूंनी कुंपण केले आहे, तर पूर्वी काही ठिकाणी द्राक्षबागांच्या भोवती माशांची जाळी वापरली जात असे, त्यामध्ये अडकून अनेकदा पक्ष्यांचा जीव जात असे. त्यामुळे त्या जाळीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यावर शेतकऱ्यांनी बागेला साड्यांचे आच्छादन घालण्याचा उपाय शोधला आहे.
पक्ष्यांपासून संरक्षण द्राक्षबागांना संरक्षण कवच म्हणून साड्या लावल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांना किती प्रयत्न केले तरी आत जाता येत नाही. शेतकऱ्याला शेतातच राहून पिकांचे रक्षण करावे लागते आणि पक्ष्यांना हाकलून द्यावे लागते. त्यामुळे आपल्या पिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखी पद्धत शोधून काढली आहे. शेतात बांधावरील झाडावर, विहिरीतील घरट्यामध्ये पक्ष्यांचे वास्तव्य असते. मात्र, शेतकरी या पक्ष्यांना धक्का लावत नाही. कलर रिबनसारखे उपाय वापरून पक्ष्यांना पिकांजवळ येऊ दिले जात नाही. मात्र, पिकांच्या काढणीनंतर अनेक शेतकरी पक्ष्यांना २० टक्के पीक राखीव ठेवतात. - प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद