निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड असून, महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात.
हवामान
निशिगंध फूल पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानातही जेथे पाण्याची बारमाही सोय असते तेथे या पिकाची फायदेशीर लागवड करता येते. अतिथंड हवामान व अतिपाऊस या पिकास हानिकारक ठरतात.
जमीन
पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू साधारणता ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्या जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा किंवा लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जमिनीत कुजण्यासाठी गाडावे. लागवडीसाठी अयोग्य जमिनीची निवड करू नये.
लागवड
• निशिगंध हे पीक बहुवर्षीय असून एकदा लागवड केल्यास त्या जमिनीत सतत तीन वर्षे ठेवता येते किंवा प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते.
• एप्रिल मे महिन्यात लागवड करावी. लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावेत.
• लागवडीसाठी निवडलेले कंद ०.२ टक्के तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशक द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लागवडीस वापरावे.
• लागवड सपाट वाफे अथवा गादीवाफ्यावर ३० x ३० सेंटीमीटर अंतरावर ५ ते ७ सेंटीमीटर खोलीवर करावी. एका ठिकाणी एकच कंद लावावा. हेक्टरी ७० ते ८० हजार कंद पुरेसे होतात.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
• हेक्टरी ४० ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, ३०० किलो नत्र २०० किलो स्फुरद आणि ३०० किलो पालाश द्यावे. शेणखत लागवडीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे.
• लागवडीच्या वेळी ६० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे व उरलेले २४० किलो नत्र तीन समान भागत लागवडीनंतर ३०, ६० आणि ९० दिवसांनी द्यावे.
• लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी १० किलो अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरिलम १०० किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा.
• अशाच प्रकारे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी दहा किलो १०० किलो ओलसर शेणखतात वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्टर निशिगंधाच्या पिकास द्यावे.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे नियमित पाणी द्यावे. फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होते.
प्रकार व जाती
फुलांच्या पाकळ्यांची संख्या व पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमीडबल, व्हेरीगेटेड असे मुख्य चार प्रकार आहेत.
• सिंगल प्रकार - स्थानिक सिंगल, अर्का शृंगार, अर्का प्रज्वल, फुले रजनी या जाती आहेत.
• डबल प्रकारात - स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव व फुले रजत या जाती आहे.
• व्हेरीगेटेड प्रकारात - सुवर्णरेखा, रजत रेखा, सिक्किम लोकल आणि स्थानिक जातींचा समावेश होतो. निशिगंध फुलापासून ०.०८ - ०.११ % सुगंधी द्रव्य मिळू शकतात.
फुलांची काढणी व उत्पादन
• लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी फुले काढणीस योग्य होतात. पूर्ण वाढ झालेल्या कळ्यांची व उमललेल्या फुलांची काढणी नेहमी सकाळी पाच ते आठ किंवा संध्याकाळी सहा ते सात वाजता करावी.
• फुलदाणीत किंवा पुष्पगुच्छ यासाठी सर्वात खालची दोन-तीन फुले असतात. उमलत असलेले फुलदांडे जमिनीलगत पानाच्या वरील बाजूस छाटावेत.
• अशा छाटलेल्या फुल्ल दांड्यांच्या एक एक डझनच्या जोड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बांबूच्या किंवा कागदच्या बॉक्समध्ये भरून दुरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावी.
• साधारण हेक्टरी ८ ते १० लाख फुले मिळतात, तर सुक्या फुलांचे उत्पादन हेक्टरी सात ते आठ टन मिळते.
• सुट्ट्या फुलांना भारतीय बाजारपेठेत भरपूर व नियमित मागणी असल्यामुळे अशी फुले बाजारपेठेत ५-७ किलो क्षमतेच्या बांबूच्या किंवा कागदाच्या बॉक्समध्ये भरून बाजारपेठेत विक्रीस पाठविली जातात.
• सुट्ट्या फुलांपासून गुलछडी अर्क हे सुगंधी द्रव्य ०.०८-०.११ टक्के काढता येते अशा द्रव्यांना परदेशातून ही चांगली मागणी असते.
विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे
अधिक वाचा: Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती