महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे.
जास्त पाऊस पडत असल्यामुळे तूर पिकावर फायटोप्थोरा व मर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाची लक्षणे व त्यावरील उपाययोजना खालीलप्रमाणे आहे.
मर रोगाची लक्षणे
- हा रोग फ्युजारियम उडम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते शेंगा धरण्याच्या अवस्थेपर्यंत होतो.
- जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
- शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.
- पानाच्या शिरा पिवळ्या होतात व पाने पिवळी पडतात. झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात.
- जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना सुद्धा पाण्याचे वहन या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडाच्या वरच्या बाजूला भागाला पाणी पोहोचत नसल्यामुळे पाने पिवळी पडतात व नंतर झाड हिरव्या स्थितीत वाळते.
- जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते.
- वाळलेल्या झाडाची पाने गळत नाही. तसेच रोगाची तीव्रता पीक फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त असते. अंशतः मर हे सुध्दा मर रोगाचे लक्षण आहे.
- अशा झाडांच्या एक किंवा दोनच फांद्या वाळलेल्या असतात, उर्वरीत संपूर्ण झाड सामान्य स्थितीत असते.
- रोगग्रस्त झाड उपडले असता ते सहज उपडून येत नाही त्याला उपडण्याकरीता निरोगी झाडा एवढीच ताकद लागते.
नियंत्रणाचे उपाय
१) उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी.
२) शेतामध्ये रोगट झाडे दिसताच त्वरीत उपटून टाकावी.
३) सलग तुरीच्या पिकापेक्षा तुरीसोबत ज्वारीचे आंतर पीक घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
४) पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तुरीचे पीक घेण्याचे टाळावे.
५) ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात या पिकाची लागवड चार ते पाच वर्षांपर्यंत करू नये.
६) रोग प्रतिबंधक वाण उदा. बीडीएन ७१६, गोदावरी, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, आय.सी.पी.एल.- ८७११९, पीकेव्ही तारा इत्यादी वाणांचा वापर पेरणी करता करावा.
७) बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम ३७.५ + थायरम ३७.५ टक्के डब्लू. एस. या मिश्र बुरशीनाशकाची ४ ग्रॅम त्यानंतर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
८) पेरणीच्या वेळी २ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या २०० किलो शेणखतात मिसळून द्यावा.