Tur Pest Management : तुरीचे पीक फुलधारणा अवस्थेत असताना वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव (pest control) वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. फवारणी करूनही किडीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविता येत नसल्याने, उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सततच्या पावसामुळे अडचणीत आले आहेत. त्यातच तूर पिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उरल्यासुरल्या पिकाचेही नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे.
शेतकरी कीड नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी करत आहेत; परंतु औषधाचाही उपयोग होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली नसली तरी अधूनमधून ढगाळ वातावरण राहात आहे.
त्यात दमट हवामान तूर पिकावरील किडींसाठी पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणामुळे अळीपासून तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागांत तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी, पिसारी पतंग या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वेक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांनी या अळींची व्यवस्थापन करण्याबाबतचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील तज्ज्ञांनी दिला आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तूर चांगल्या अवस्थेत आहे. खरीप हंगामातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी तूर पिकाची योग्य निगा राखत असून, अनेकांनी तुरीला पाणी देण्यास सुरुवात केली आहे.
अशातच तुरीवर विविध अळींचा प्रादुर्भाव होत असल्याने पीक उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यावर काय उपाय करावा, फवारणी कधी करावी, याबाबत शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
तुरीचे पीक फुलांवर आले असताना अचानक वातावरणातील बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. महागड्या औषधांची फवारणी करण्याचा खर्च मात्र वाढला आहे. - गणेश इंगोले, शेतकरी, वाशिम
एकात्मिक व्यवस्थापन
शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी आणि पिसारी पतंग या प्रकारच्या तिन्ही किडी अळ्या फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनकरता जवळजवळ सारखेच उपाय करावे लागतात. प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावे, त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊ फस्त करतात. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील व त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
पिकाची पाहणी करून व्यवस्थापन करा
तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक वातावरण आहे. त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव वाढून पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पाहाणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे, विषय विशेषज्ञ प्रा. प्रवीण देशपांडे यांनी केले आहे.
असे आहेत तुरीवरील अळीचे प्रकारशेंगा पोखरणारी अळी :
या किडीची मादी पतंग फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून, तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे उकरून खातात.
शेंगमाशी :
या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून, तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.
पिसारी पतंग :
या पतंगाची अळी १२.५ मिमी लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात आणि शेंगेवरील साल खरडून छिद्र करते, बाहेर राहून दाणे पोखरते.
वेळीच फवारणी करा
पहिली फवारणी : पीक ५० टक्के फुलोरावर असताना, निंबोळी अर्क ५ टक्के, अझाडेरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली, अझाडेरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली, क्च्रिनॉलफॉस २५ ईसी २० मिली, यापैकी कोणतेही प्रति १० लिटर पाण्यास मिसळून फवारणी करावी
दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी इमामेक्टीन बेंझोएट ५ एसजी ३ ग्रम, क्लोरेंनट्रानीप्रोल ५ टक्के एस.सी २.५ मिली यापैकी कोणत्याही एका किटनाशकाची प्रति १० लिटर पाण्यास मिसळून फवारणी करावी.