Join us

Turmeric हळद लागवडीच्या या टीप्समुळे मिळेल लाखोंचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:04 AM

Turmeric Cultivation अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड करणे परंपरा आहे; परंतु तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर वाढीवर परिणाम होतो त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड फायदेशीर ठरते

सांगलीची ओळख असलेले हळद पीक गेल्या दोन ते तीन वर्षांतील दरात झालेले चढ-उतार व पुरामुळे होणारे नुकसान यामुळे हळदीची बाजारपेठ असलेल्या सांगली जिल्ह्यात क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. 

मात्र यावर्षी हळदीच्या बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि दराचे नवे उच्चांक निर्माण केले. त्यामुळे काहीशी पाठ फिरविलेले शेतकरी पुन्हा हळद लागवडीचा विचार करू लागले आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड करणे परंपरा आहे; परंतु तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर वाढीवर परिणाम होतो त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात हळद लागवड फायदेशीर ठरते. 

हळद पीक ८ ते १० महिने जमिनीमध्ये राहत असल्यामुळे वाढ चांगली होण्याकरिता निचरा होणारी जमीन आवश्यक आहे.

या जातींना प्राधान्यहळद लागवड करताना सेलम, कृष्णा, कडप्पा, वायेगाव, राजापुरी, फुलेस्वरूपा, बीएसआर-२, प्रगती, प्रतिभा, राजेंद्रसोनाली, प्रभा, मेघा या अनेक उत्तम जाती वापरल्या जातात.

हळदीसाठी जमीन कशी नसावी?• कमी निचरा व कडक होणाया अतिकाळी, क्षारयुक्त अशा जमिनीत कंदकुज मर कंदसड हा रोग मोठ्या प्रमाणात येतो व या जमिनीत कंद पोसत नाहीत; तसेच अतिहलकी व चुनखडीयुक्त जमीनसुद्धा या पिकासाठी उपयोगी नाही.• हळद पिकाचे कंद जमिनीत पोसत असल्यामुळे जमीन जेवढी भुसभुशीत असेल तेवडी उत्पादन व गुणवत्तेत वाढ होते.• निवडलेल्या जमिनीची १८ ते २२ सें.मी खोल नांगरणी करून रोटाव्हेटर व वखराच्या पाळ्या देऊन ढेकळ फोडून शेवटच्या वखरपाळी अगोदर जमिनीत २० ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत व त्यात ट्रायकोडर्मा १ किलो, मेटारायझियम १ किलो, पॅसिलोमायसेस १ किलो हे मिसळून जमिनीत टाकावे.• १ एकर लागवडीसाठी १० क्विंटल जेठे गड्डे (त्रिकोणकृती मातृकंद) बेणे आवश्यक असते. अंगठे गड्डे आणि हळकुंड बियाणापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक मिळते. साधारण ५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, रसरशीत तसेच नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडे कोंब आलेले बेणे लागवडीसाठी चांगले.• बेणेप्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली अधिक कार्बेन्डाझिम (५० टक्के पाण्यात विरघळणारे) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले गड्ढे १५ ते २० मिनिटे बुडवावेत नंतर बेणे सावलीत सुकवावे. यानंतर पेरणीपूर्वी जैविक बेणे प्रक्रिया करावी.

हळद पिकासाठी माती परीक्षणानुसार खत वापरावे• हळद पिकास पाट पाण्याने पाणी द्यावयाचे असल्यास सरी वरंबा पद्धत वापरली जाते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास रुंद वरंबा पद्धत फुटव्यांची संख्या चांगली राहते.• पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे कंदकुज कमी होते. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. एका गादी वाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात.• आंतरपिकांसाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, उदीड, मूग ही पिके घेता येतात. मका लागवड करू नये.• लागवडीनंतर जमीन ओलसर असताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अॅट्राझिन (५० डब्ल्यूपी) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.• तणनाशकांचा वापर लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनंतर करू नये, लागवडीनंतर आंबवणीचे पाणी लगेच ३ ते ४ दिवसांच्या अंतराने द्यावे.• लागवडीनंतर २० दिवसांनी मेटारायझियम अॅनासोप्ली ५ किलो, बिव्हेरिया बॅसियाना ५ किलो व ट्रायकोडर्मा ५ किलो या परोपजिवी बुरशी २०० लिटर पाण्यात, १ किलो गूळ भिजत ठेवून खोडाभेवती ड्रेचिंग करावी.

मनोजकुमार वेताळकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

अधिक वाचा: सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी

टॅग्स :शेतीशेतकरीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनपीकखते