Join us

मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण प्रसारित वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:36 AM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला आहे. यात कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे

केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला.

याबाबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित देशी कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे.

देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश केल्‍यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्‍यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले.

देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्‍याची माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग यांनी दिली. 

१) देशी कपासीचा पीए ८३३ वाण- हा वाण विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पामार्फत विकसित करण्यात आला.या वाणाची उत्पादकता १५ ते १६ क्विंटल प्रति हेक्टर असून रुईचा उतारा ३५ ते ३६  टक्के आहे.धाग्याची लांबी २८ ते २९  मिलिमीटर आहे.१५० ते १६० दिवस कालावधी लागतो.या वाणाचा विशेष गुणधर्म म्हणजे सरळ धाग्याची लांबी व मजबुती.रस शोषक किडी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील.पाण्याच्या ताणास देखील सहनशील.

२) अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ वाण- हा अमेरिकन कापसाचा वाण असून या वाणाची उत्पादकता १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टर असून रुईचा उतार ३७ ते ३८ टक्के आहे.धाग्याची लांबी २५ ते २६ मिलिमीटर.वाणाचा कालावधी १५५ ते १६० दिवस.पाण्याच्या ताणास व रस शोषक किडीस सहनशील.सधन पद्धतीने लागवडीस योग्य.

अधिक वाचा: परभणी कृषी विद्यापीठाकडून मर रोगास प्रतिबंधक हरभऱ्याचे नवीन वाण विकसित वाचा सविस्तर

टॅग्स :कापूसपीकशेतीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठकेंद्र सरकार