Umaid Abhiyan :
सूरज पाटील
गावांचा विकास करतांना स्वच्छ्ता अभियान महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे गावांचा कायपालट होणार आहे. यवतमाळमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत मार्च २०२५ पर्यंत राज्य हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहेत.
राज्यातील ४० हजार २७० गावांपैकी १६ हजार ७२८ गावे हागणदारीमुक्त मॉडेल झाली आहेत. उर्वरित २३ हजार ५४२ गावे मॉडेल करण्यावर फोकस आहे. यासाठी आता 'स्वच्छतेचे काम, स्वच्छ बचत गटांसोबत 'ही संवाद मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानाच्या दशसूत्रीमध्ये आरोग्य व स्वच्छता विषयाची अंमलबजावणी करण्यात येते.
उमेदअंतर्गत गावपातळीवर महिला स्वयंसहायता बचत गट कार्यरत आहेत. हे गट गाव, वाडी, वस्ती पाडा, तांडा, मोहल्ला, गल्ली स्तरावर आहेत. किमान १० ते कमाल १५ कुटुंबांचा समावेश असतो. गावातील अशा किमान १० गटांचा मिळून १ ग्रामसंघ तयार होतो.
या संवाद मोहिमेत त्या-त्या गावातील ग्रामसंघाअंतर्गत बचत गटाच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात 'स्वच्छतेचे दोन रंग'च्या माध्यमातून 'ओला कचरा, सुका कचरा'चा जागर करण्यात आला होता. आता संवादातून गावे मॉडेल करण्यावर फोकस करण्यात आला आहे.
हा आहे कालावधी
६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत तालुकास्तर ते गावपातळीपर्यंतच्या घटकांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रशिक्षण व संवाद मोहीम राबविण्यात येईल.
२१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गावस्तरावरील सर्व बचत गटातील सदस्यांसोबत संवाद मोहीम राबविली जाणार आहे.
अंमलबजावणीचे निर्देश
मोहिमेच्या माध्यमातून उमेद परिवारातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद होणार आहे. त्या कुटुंबाच्या स्वच्छताविषयक स्थितीत अनुकूल परिवर्तन व्हावे, ग्रामीण महिलांच्या स्वच्छता सवयीत बदल होईल, त्याचबरोबर महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.गावांना अपेक्षित दृश्यमान स्वच्छता दर्जा प्राप्त ही अपेक्षा आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेखर रौंदळ, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अति. अभियान संचालक व परमेश्वर राऊत, उमेदचे मुख्य परिचालन अधिकारी यांनी ही माहिती दिली.