राज्यात उन्हाळी भूईमुग लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. परंतू उत्पादकता मात्र कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाद्वारे शिफारशीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उन्हाळी हंगामात भूईमुग पिकापासून अधिक उत्पादन घेण्यास बराच वाव आहे.
म्हणुन यावर्षी शेतकरी बंधूनी आपल्या कडील उपलब्ध संसाधने व तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालुन उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहीजे. याकरीता भूईमुगाच्या वाणांची निवड महत्वाची आहे.
सुधारीत जाती व बियाणे
- उन्हाळी भूईमुग मे महिन्या अखेर पर्यंत निघणे आवश्यक असते.
- कारण त्यानंतर खरीप हंगामाचे पीक पेरणीची वेळ येते.
- त्याकरीता ११० ते ११५ दिवसात परिपक्व होणाऱ्या उपट्या प्रकारातील जातीची निवड करावी.
- उन्हाळी हंगामाकरीता टीएजी ७३, टीएजी २४ आणि एसबी ११ या वाणापैकी एका वाणाची निवड करावी.
टीएजी ७३
- हा नवीन वाण विद्यापीठाने विकसित केलेला आहे.
- या वाणाची उत्पादन क्षमता टीएजी २४ या वाणा पेक्षा जास्त आहे.
- तसेच दाण्याचा उतारा सुध्दा जास्त आहे.
टीएजी ७३ किंवा टीएजी २४ हे वाण उन्हाळी हंगामाकरीता उत्कृष्ट असे वाण आहेत. हे दोन्ही वाण लवकर (उन्हाळी हंगामात ११० ते ११५ दिवसात) परिपक्व होणारे आहेत.
बियाणे प्रमाण
सर्वसाधारणपणे १०० ते १२५ किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते, परंतु बियाण्याचे प्रमाण ठरवितांना पेरणीकरीता निवडलेला वाण, हेक्टरी झाडांची संख्या (सरासरी ३.३३ लाख), बियाण्यातील १०० दाण्यांचे वजन, उपलब्ध बियाण्याची उगवणशक्ती याचा सामाईक विचार करावा. शक्यतोवर खरीप हंगामातील बियाणे उन्हाळी हंगामात पेरणी करीता वापरावे.
बियाणे आणि महत्वाच्या बाबी
- शेंगा पेरणीपूर्वी खूप अगोदर फोडू नये.
- चांगले दाणे निवडून पेरणी करावी.
- चांगल्या वाणाच्या बियाण्याचे गुणन स्वतःच करावे व स्वतःचे बियाणे स्वतःच निर्माण करावे.
अधिक वाचा: तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड