Join us

बिगर मोसमी पावसाच्या ओलीचा रब्बी पिकांसाठी असा होईल उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:17 PM

अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची हानी झाली, तरी रबीसाठी या पावसाचा उपयोग कसा होऊ शकेल, याबाबत उपाययोजना.

- डॉ. कल्याण देवळाणकर, कृषीशास्त्रज्ञ

गेल्या एक-दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात बिगरमोसमी पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारांचाही पाऊस पडला आहे. बदलत्या हवामानात अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करतच शेतकरी बांधवांना शेती करावी लागत आहे. 

खरिपातील बहुतांश पिकांची आतापर्यंत काढणी-मळणी झालेली असल्याने तयार झालेल्या पीक उत्पादनाचे फारसे नुकसान झाले नसावे अशी आशा करूयात. सध्या शेतात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील पिकांना  या बिगरमोसमी पावसाचा (गारांचा पाऊस वगळता) फायदा होणार आहे. परंतु त्यासाठी शेतकरी बांधवांना काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. 

असे करा उपाय पडलेल्या पावसाची ओल जमिनीत दीर्घकाळ टिकवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे वाफशावर व त्यानंतर १५ दिवसाच्या अंतराने उभ्या रब्बी पिकात दोन ओळीत कोळपणी करणे. 

या पडलेल्या पावसाने पिकात तणांचा प्रादुर्भाव होतो, या तणांचे नियंत्रणही करणे पिकात वारंवार केलेल्या कोळपणीमुळे शक्य होते. 'एक कोळपणी करणे म्हणजे पिकास अर्ध्या पाळीचे पाणी देणे' असे यामुळेच म्हंटले जाते.  कोळपणीमुळे जमिनीचा पृष्ठभाग मातीने झाकला जाऊन पृष्ठभागावरून होणा-या बाष्पीभवनास आळा बसतो. तसेच जमिनीतील उपलब्ध ओलावा दीर्घकाळपर्यंत पिकास उपलब्ध होतो.

रब्बी हंगामात घेतलेल्या कोरडवाहू पिकांना त्यांच्या दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत जमिनीतून ओलावा उपलब्ध होत राहिला, तर पिकांचे भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर पडलेल्या या बिगरमोसमी पावसाचा होणारा फायदा लक्षात घेतला पाहिजे. 

पडलेल्या पावसाच्या ओलीचा पिकांसाठी दीर्घकाळ फायदा करून घेण्यासाठी पिकाच्या दोन ओळीत आच्छादन टाकणे हाही एक चांगला उपाय आहे. त्यासाठी शेतातील काडीकचरा, पालापाचोळा, गव्हाचा/ भाताचा भुसा, ऊसाचे पाचट यांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. 

हे आच्छादन कालांतराने कुजले आणि जमिनीत गाडले तर त्याचा सेंद्रिय खत म्हणूनही पिकास उपयोग होतो. फळझाडांभोवती केलेल्या आळ्यात आच्छादन टाकल्याने विशेष फायदा होतो. 

बिगर मोसमी पावसामुळे पिकांवर रोगराई येऊ नये म्हणून पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर पालाशयुक्त विद्राव्य खतांची फवारणी करावी.

टॅग्स :गारपीटरब्बीपाऊसपीक व्यवस्थापनशेतकरी