Join us

Urea Fertilizer युरिया वापरताय जरा जपूनच; अवाजवी वापर ठरू शकतो घातक

By बिभिषण बागल | Published: July 23, 2023 2:47 PM

युरिया या नत्रखतांचे नाव माहित नाही, असा शेतकरी शोधून सापडणार नाही. या खताचा वापर सर्वत्र प्रचलित असून लोकप्रिय झाला आहे. अल्पावधीमध्येच पिकांची होणारी जोमदार वाढ, हिरवागार तजेलदारपणा आणि उत्पादनात होणारी भरघोस वाढ शेतकरी दृष्टीआड करू शकत नाही.

देशामध्ये हरितक्रांतीच्या सुरुवातीला शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात आला होता. पण हळूहळू शेतकरी त्याच्या वापराच्या आधीनच झाले. चीनसारख्या देशाने अशा खतांच्या वापरानंतर अत्याधिक उत्पादन आल्यानंतर शेतकऱ्यांना जैविक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात यश मिळवले. पण भारतात मात्र ते अजून तरी शक्य झालेले नाही. 

युरिया या नत्रखतांचे नाव माहित नाही, असा शेतकरी शोधून सापडणार नाही. या खताचा वापर सर्वत्र प्रचलित असून लोकप्रिय झाला आहे. अल्पावधीमध्येच पिकांची होणारी जोमदार वाढ, हिरवागार तजेलदारपणा आणि उत्पादनात होणारी भरघोस वाढ शेतकरी दृष्टीआड करू शकत नाही.

म्हणूनच आपल्या देशात वेगवेगळ्या रासायनिक खतांपैकी सर्वात जास्त उत्पादन आणि वापर हा नत्रयुक्त रासायनिक खतांचाच आहे. नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरिया चा वापर सर्वाधिक जास्त ५९% पर्यंत असून अमोनिअम व कॅल्शीयम नायट्रेट (कॅन) चा वापर फक्त २ टक्केच शेतकरी करतात.

युरिया खत वापराविषयी शेतकऱ्यांची पसंती का?

पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. बाजारात युरिया सहजपणे उपलब्ध असतो. ड्रीपच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतात. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात.

युरिया खताचे गुणधर्म:

  • युरिया हे कृत्रिम सेंद्रिय नत्रयुक्त खत आहे.
  • युरिया मध्ये ४६% अमाईड नत्र असते.
  • खत पांढरेशुभ्र दाणेदार आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते.
  • युरिया खत आम्लधर्मिय आहे.
  • युरिया मध्ये २०.६% ऑक्सिजन, २०% कार्बन, ७% हायड्रोजन आणि १ ते १.५% बाययुरेट हे उपघटक असतात.
  • पावसाळी, तसेच दमट हवामानात आद्रता शोधून घेतल्यामुळे या खताचे खडे तयार होतात. तसेच अन्य ‍खतांत मिसळताना पाणी सुटणार नाही याची खात्री करावी.
  • नत्राचे अमाइड रुपांतर युरीयेज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नाइट्रेट स्वरूपात होते. 

सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांच्या गुणोत्तर हे ४:२:१ चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र:स्फुरद:पालाश वापर करणे गरजेचे आहे. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी २:१:१ नत्र:स्फुरद:पालाश गुणोत्तर असावे. कडधान्यांसाठी १:२:१ नत्र:स्फुरद: पालाश गुणोत्तर असावे.

युरियाचा वापर घातकच?- केवळ नत्रयुक्त खतांचा वापरा केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते. रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते आणि पिक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो.युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते.जमिनीमध्ये अमोनियावायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टर सारख्या जीवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गाडूंळाच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो.

विना निमकोटेड युरिया वापरल्यानेयुरिया जमिनीत मिसळल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरु होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो. त्यामुळे जमिनीतील पाणी दुषित होते. या संपूर्ण प्रक्रिया द्वारा नायट्रस ऑक्साइड नावाचा ग्रीनहाउस वायू  तयार होतो. त्यामुळे वातावरणातील हवा दुषित होते.युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (१० पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते. पाण्यातील शेवाळ व पानवनस्पतींची वाढ होते.युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाईड नत्राच रुपांतर अमोनिया आणि नायट्रेट मध्ये होते. नायट्रस ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. हे वायू ३०० पटीने कार्बनडायऑक्साइड पेक्षा घातक आहे.पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायुच्या स्तरास छिद्रे पडून, सुर्यापासून उत्पन्न झालेले अतिनील किरणे जमिनीच्या पृष्टभागावर पोहोचतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते.

युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी

  • खते देण्यापूर्वी माती परिक्षण करावे माती परीक्षण अहवालानुसार खते द्यावीत.
  • नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा.
  • हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
  • नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
  • कालावधी कमी असल्याने नत्र खताची मात्रा विभागून द्यावी. एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा. युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना अॅझोटोबॅक्टर/अॅसिटोबॅक्टर तर द्विदल पिकांना रायझोबियम या जीवाणू खतांची २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  • जैविक खतांच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५-२० टक्के नत्राची बचत होते व ऊसामध्ये ५० टक्के पर्यंत बचत होते. भातासारख्या पिकास युरिया ग्रॅनुल्सचा वापर करावा.
  • पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा.
  • कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.
  • ऊस, केळी, बीटी कापूस यासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागुण द्यावी.
  • नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रीत आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी.
  • क्षारयुक्त व चोपणयुक्त जमिनीत युरिया खते हे शेणखत, कंपोस्टखत अथवा गांडूळ खताबरोबरच द्यावे. तसेच युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी.

डॉ. आदिनाथ ताकटेमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी9404032389

अधिक वाचा: हिरवळीच्या खतांना शेतीत गाडूया, मातीला समृद्ध करूया

टॅग्स :खतेशेतीपीकपीक व्यवस्थापनसरकारशेतकरीसेंद्रिय खत