पूर्वहंगामी उसाची लागवड आपण ३० नोव्हेंबरपर्यंत करू शकतो. बेण्याच्या आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार अजूनही ऊस लागणी सुरु आहेत. पूर्वहंगामी ऊस लागवड करताना व्यवस्थापनातील खालील काही प्रमुख बाबींचा अंतर्भाव केला तर पिक फायदेशीर ठरते.
पूर्वहंगामी ऊस लागवड करताय हे करा.
- लागणीसाठी को ८६०३२, फुले ०२६५, फुले १०००१, फुले ०९०५७, कोसी ६७१, फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ यापैकी कोणत्याही शिफारशीत वाणांचा जमिनीच्या मगदूरानुसार वापर करावा.
- पाणी बचत होण्याच्या दृष्टीने मध्यम जमिनीसाठी ७५- १५० सें.मी. व भारी जमिनीसाठी ९०-१८० सें.मी. पट्टा पध्दतीचा वापर करावा. सलग पद्धतीने लागवडीसाठी मध्यम जमिनीत १०० सें.मी. ते १२० सें.मी. तर भारी जमिनीमध्ये १२० ते १५० सें.मी. दोन सऱ्यातील अंतर ठेवावे. पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
- लागणीपूर्वी बेण्यास १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेणे १० मिनीटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेनंतर १ किलो अॅसेटोबॅक्टर अथवा १ लिटर द्रवरूप अॅसेटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू १२५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात कांड्या ३० मिनीटे बुडवाव्यात.
- लागणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) (१.९३ पोती), को. ८६०३२ जातीसाठी व इतर सर्व जातींसाठी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) (१.६४ पोती), तसेच ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (११.८ पोती) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) (३.१६ पोती) ही रासायनिक खते सरीमध्ये द्यावीत.
- पूर्वहंगामी उसात आंतरपिक म्हणून बटाटा, मुळा, लालबीट, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा व कांदा, यासारख्या भाजीपाला पिकांचा समावेश करावा.
- लागणीनंतर वापसा येताच ५० ग्रॅम अॅट्राझिन किंवा मेट्रीब्यूझीन १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमिनिवरिल तणावर फवारावे. जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- माती परीक्षणाच्या आधारे सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स हि सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त सुक्ष्म खते चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ प्रमाणात मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून शेतात चळी घेवून द्यावीत.
- ठिबक सिंचनाची सोय असल्यास पाण्यातून प्रति एकरी नऊ किलो युरिया, दोन किलो युरिया फॉस्फेट व सहा किलो म्युरेट ऑफ पोटॅश या विद्राव्य खतांची मात्रा दर आठवड्यातून एकदा द्यावी.
अधिक वाचा: उसाच्या जातीनुसार उसाच्या तोडणीचे नियोजन कसे करावे वाचा सविस्तर