महाराष्ट्रामध्ये सन २०२२-२३ या वर्षात १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. त्यापासुन हेक्टरी सरासरी ९१.२४ टन ऊसाचे उत्पादन मिळाले.
सदर वर्ष महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत आणि शेतकरी यांना फायदेशीर ठरले असून उत्पादन वाढीत पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या तंत्राचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे.
लागवडीचे हंगामआडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते.
पूर्वहंगामी उसाचे व्यवस्थापन कसे कराल?
- पूर्वहंगामी ऊसाची लागण १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करा.
- लागणीसाठी को ८६०३२, फुले ०२६५, फुले १०००१, फुले ०९०५७, कोसी ६७१, फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ यापैकी कोणत्याही शिफारशीत वाणांचा जमिनीच्या मगदूरानुसार वापर करावा.
- लागणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) (१.९३ पोती) को ८६०३२ जातीसाठी व इतर सर्व जार्तीसाठी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) (१.६४ पोती) तसेच ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) (११.८ पोती) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) (३.१६ पोती) ही रासायनिक खते सरीमध्ये द्यावीत.
- लागणीपूर्वी बेण्यास १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेणे १० मिनीटे बुडवुन बेणे प्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेनंतर १ किलो अॅसेटोबॅक्टर व १२५ स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात कांडया ३० मिनीटे बुडवाव्यात.
- पाणी बचतीच्या होण्याच्या दृष्टीने मध्यम जमिनीसाठी ७५-१५० सें.मी. पट्टा पद्धतीचा वापर करावा यासाठी ७५ सें.मी. अंतराच्या जोड ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडावी सलग पद्धतीने लागवडीसाठी हलक्या जमिनीत ९० सें.मी., मध्यम जमिनीत १०० सें.मी. तर भारी जमिनीमध्ये १२० सें.मी. दोन सऱ्यातील अंतर ठेवावे.
- पाण्याच्या अधिक बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
- लागणीनंतर वापसा येताच ५० ग्रॅम अॅट्राझिन किंवा मेट्रीब्युझीन १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे. जमिन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- पूर्वहंगामी उसात आंतरपिक म्हणून बटाटा, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, कांदा व लसून, यासारख्या भाजीपाला पिकांचा समावेश करावा.
- लोकरी मावाग्रस्त ऊसावर मित्रकीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. लोकरी माव्यासाठी डिफा अॅफिडीव्होरा, मायक्रोमस, क्रायसोपर्ला यासारख्या मित्र किटकांचे संवर्धन करावे. तसेच ऊसासाठी शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलीत वापर करावा.
- उसावरील तांबेरा व तपकिरी ठिपके रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी अॅझोऑक्सीस्ट्रॉबीन १८.२% + डायफेनकोन्याझोल ११.४% एस. सी. ०.१% (१० मिली प्रति १० लिटर पाणी) या संयुक्त बुरशीनाशकाच्या तीन फवारण्या रोगाच्या प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
अधिक वाचा: Sugarcane Planting : उसाची रोपाने लागवड कशी करावी व एकरी किती रोपे लावावीत