रासायनिक खतांच्या अति वापरामुळे मातीचे आरोग्यही धोक्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होत असून, जमिनीच्या मूलभूत घटकांचे असंतुलन झाले आहे. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा लागणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना माती परीक्षण करून मृदा पत्रिका काढावी. पत्रिकेनुसार आवश्यक उपाययोजना करणे शक्य होत आहे. शेणखताच्या वाढत्या दरामुळे कंपोस्ट खत, गांडूळ खत शेतकऱ्यांना तयार करणे शक्य आहे. जमिनीतील सामू, जस्त, तांबे, नत्र या घटकांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे उत्पादकता घटत आहे.
रासायनिक खते
- रासायनिक खतांचा संतुलित वापर केला पाहिजे. नत्रयुक्त खतांचा वापर अतिरिक्त होतो.
- यातील बहुतांश खत पाण्याबरोबर वाहून जाते.
- जमिनीत निचरा होतो किंवा सूर्याच्या उष्णतेने वाफेत रूपांतर होते.
- एकूणच जमीन, पाणी आणि हवा यांच्या प्रदूषणात वाढ होते.
- रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खते जमिनीवर फेकू नयेत, योग्य ओलावा असताना द्यावीत.
- पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत.
- युरिया, निंबोणी पेंड सोबत १:५ या प्रमाणात वापर करावा.
- सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.
जमिनीची सुपिकता वाढविण्याचे मार्ग
पेरणीपूर्व मशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश असावा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत याचा वापर करावा. खत म्हणून जैविक, जिवाणूंचा वापर करावा. रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोलपणा असावा तरच सुपिकता वाढून चांगले उत्पन्न मिळू शकेल.
जमिनीच्या आरोग्यासाठी खतांचा वापर
जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब गरजेचे असून, सेंद्रिय खतांसह जीवाणू खते वापरावीत. शेणखत पूर्ण कुजलेले वापरावे. अन्यथा खत कुजविण्याच्या प्रक्रियेसाठी जमिनीची ताकद कमी होते.
अधिक वाचा: माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?