मुबलक पाणीसाठ्यामुळे बागायती शेतीत प्रचंड वाढ झाली आहे. रब्बीची पिके, कांदा व इतर पिके जोमात यावीत, यासाठी रासायनिक खतांचा मोठा वापर केला जातो. पण, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनापेक्षा जास्त तर खर्च खतावर होत आहे.
परंतु, जमिनीचा पोतही बिघडत आहे. त्यामुळे रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. रासायनिक खत हा शेतीबरोबरच मानवी जीवनाला हानिकारक ठरत आहे, असे पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत महागड्या रासायनिक खतांपेक्षा शेणखत परवडू लागल्याने सेंद्रिय शेतीकडे काही शेतकऱ्यांचा कल आता जास्त प्रमाणात दिसत आहे. बहुतेक शेतकरी रासायनिक शेती कमी करून शेणखत, लेंडी खत, कोंबड खत अशा खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत.
दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क व विविध वनस्पतींपासून जैविक कीडनाशके तयार करण्याचे काम ही प्रगतशील शेतकरी करीत आहेत. रासायनिक शेतीला बगल देत सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळल्यामुळे सेंद्रिय शेतीत खताचा खर्च कमी आणि उत्पन्न उत्पादन जास्त मिळत आहे.
अव्वाच्या सव्वा रासायनिक खतासाठी खर्च करूनही शेतीचा पोत बिघडत असल्यामुळे सेंद्रिय खताकडे शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात दिसत आहे.
रासायनिक खतापेक्षा शेणखत फायद्याचे
१) रासायनिक सर्वच खते प्रति पन्नास किलोची बॅग याप्रमाणे असतात. १,६५०, १,७००, १,८०० रूपये असे भाव आहेत. हे रासायनिक खतांचे भाव पाहिले तर सर्वसामांन्याना परवडत नाहीत.
२) शेणखत ट्रॅक्टर ट्रॉली चार हजार रुपये, तीन ट्रॉलींमध्ये एक एकर शेत खतवून निघते. कृषी विद्यापीठे एकरी पंधरा बैलगाड्या शेणखत शेतात टाकण्यासाठी सांगतात. एकदा टाकलेले शेणखत तीन ते चार वर्षे जमिनीची पोत सांभाळतो.
३) रासायनिक खत एकरी किमान दोन बॅग वापरल्या जातात. हे खत प्रत्येक हंगामाला याच पद्धतीने वापरले जाते. शेतकरी तीन महिन्यातून किमान दोनवेळा खतांची मात्रा पिकांना देतात.
४) त्या तुलनेत ऐकवेळा शेणखत टाकले तर चार वर्षे खताचा वापर न करता शेतकरी पेरणी करू शकतात. रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानही होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय खताचा वापर सुरू केला आहे.
रासायनिक शेतीला बगल देत सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळल्यामुळे त्यांच्या सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाला भावही चांगला मिळत आहे. शेणखताच्या वापराने जमिनीची सुपीकता टिकून राहते.
विषमुक्त अन्नधान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत. त्याचप्रमाणे उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करावी, असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात कमालीची स्पर्धा वाढली आहे. शेती व्यवसायातही उत्पादन कसे घेता येईल. याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. महागड्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये नष्ट होत असून, जमीन कडक होत आहे. यामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. तसेच जमिनीचा सामो वाढत आहे, रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे मानवी आरोग्यही धोक्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जैविक खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा.
अधिक वाचा: Mati Parikshan : मातीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी किती वर्षांनी कराल माती परीक्षण?