मटकी हे एक कोरडवाहू शेतातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात (Kharif) केली जाते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने हे पीक अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या विभागात खरीप हंगामात घेतले जाते.
या पिकाची लागवड आंतरपीक म्हणून बाजरी व कापूस या पिकांमध्ये करता येते. मटकी ही वनस्पती फॅबेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलीया आहे. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरु शकते असे पीक आहे.
या पिकाची झाडे जमिनीवर पसरत असल्यामुळे हलक्या जमिनीत मृदसंधारणाचे काम हे पीक चांगल्या प्रकारे करते. काही वेळा या पिकांच्या उपयोग हिरवळीचे खत म्हणून करता येतो.
कोवळ्या शेंगाची भाजी व तयार धान्याची उसळ यामुळे महाराष्ट्रीय लोकांच्या आहारामध्ये मटकीला (matki) अन्य साधारण महत्व आहे. मटकीची लागवड भारतात राजस्थान (Rajasthan) राज्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते.
मटकी पौष्टिकता प्रति १०० ग्रॅम
प्रथिने २३ ग्रॅम (२२-२४ टक्के), ऊर्जा ३४३ कॅलरी, लोह १०.८ मि. ग्रॅम कॅल्शीअम १५० मिलीग्रॅम, जीवनसत्व क. ७.० मि. ग्रॅम, कर्बोदके ६२ ग्रॅम, झिंक १.९ मि. ग्रॅम. सोडिअम ३० मि. ग्रॅम, मॅग्नेशीअम ३८१ मि. ग्रॅम फॉस्फरस ४८९ मि. ग्रॅम, मॅग्नीज १.८ मि. ग्रॅम जीवनसत्वे B१ ते B६ इत्यादी.
मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरुन आणि तिला आच्छादन करुन वाढते. शेंगा लहान, गोलसर २-६ सेमी लांब आणि तपकिरी असून त्यात ४-९ बिया असतात. बिया वेगवेगळ्या रंगांच्या असून बहुया पिवळट तपकिरी, पांढरठ हिरव्या किंवा ठिपकेदार काळ्या असतात. परागकण किटकांमार्फत होते.
लागवडीसाठी जमीन व हवामान
मटकी लागवडीसाठी जमीन ही मध्यम, कमी पाणी धारण क्षमतेची, पाण्याचा त्वरित निचरा होणारी, मुरमाड जमीन मानवते. चोपण, पानथळ, क्षारयुक्त जमीनीत मटकीची लागवड करु नये. कमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड केली जाते. मटकी पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी २४-३२ डिग्री सेल्सियस तापमान व पाऊस हा वार्षिक ५०० ते ७५० मि.मी. आवश्यकता असते. हे पीक २०० ते ३०० मि. मी. पाऊसमानावर (Rain) तग धरु शकते.
मशागत तंत्र
मटकी पावसाच्या पाण्यावर घेतली जात असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. पावसाचा पडणारा थेंब आणि पाणी जमिनीत साठवून ठेवण्यासाठी जमिनीची मशागत करुन पेरणीपूर्वी जमीन भुसभुसीत करणे गरजेचे आहे.
शिफारशीत लागवडी योग्य वाण
अ.क्र. | वाण | पिकाचा कालावधी (दिवस) | उत्पादन क्वि. हे | वैशिष्ये़ | लागवडीचा प्रदेश |
१ | एम.बी.एस - २७ | १२५-१३० | ६-७ | केवडा रोगास प्रतिकारक | पश्चिम महाराष्ट्र |
२ | मोट नं. - ८८ | १२०-१३० | ५-७.५ | भुरी रोगास कमी बळी पडतो | विदर्भासाठी |
पेरणी पध्दत
मटकीची पेरणी तिफणीने, सरत्याने, पाभरीने अथवा काकरीच्या साह्याने करतात. एकरी साधारणपणे ५-६ किलो बियाणे लागते. पेरणीसाठी अतंर हे दोन ओळीत ३० से.मी. व दोन झाडांतील १० से.मी. अंतर राखावे. पेरणीची खोली ३-४ से.मी. असावी. सलग पेरणीसाठी मूग, उडीद, सोयाबीन प्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी व सहावी ओळ खाली ठेवून नंतर डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पाडून घ्यावा. अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.
पेरणीचा हंगाम व वेळ
१५ जून ते ७ जुलै पर्यंत पेरणी करावी किंवा मान्सूनचा पहिला पाऊस झाल्याबरोबर लगेच किंवा त्या आठवड्यात मटकीची पेरणी करावी. म्हणजेच साधारणत: ६०-७० मि.मी. पाऊस झाल्यावर पेरणी करावी. ओलीताच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा व गहु पीक घेण्यासाठी या पिकाची वेळेत पेरणी आवश्यक ठरते. महाराष्ट्रामध्ये हे पिक प्रामुख्याने आंतरपीक म्हणुन घेतली जातात. त्यासाठी मुख्य पिकासोबत ४:१ या पध्दतीने पेरणी करावी.
बीज प्रक्रिया
१ किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बिज प्रक्रिया करावी. तसेच लागवडीपूर्वी २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डाझिम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी व रायझोबिअम जिवाणू संवर्धन प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे उगवणशक्ती व उत्पादनात वाढ होते.
बियाणे प्रमाण
मटकीचे सलग पीक घेताना हेक्टरी २५-४० किलो बियाणे वापरावे व आंतरपीक म्हणुन ५-१० किलो बियाणे पुरेसे होते.
खत व्यवस्थापन
पेरणीच्यावेळी एकरी ३० किलो डी.ए.पी. व १५ किलो एम.ओ.पी. द्यावे व तसेच पेरणीवेळी एकरी ८ किलो गंधक देणे फायद्याचे ठरते.
तण व्यवस्थापन
तण नियंत्रण करताना सुरुवातीचे ३०-४५ दिवस अत्यंत महत्वाचे असतात. नंतर पीक पूर्ण शेत व्यापत असल्याने तणांचा प्रार्दुभाव आपोआपच कमी होतो. पीक २० दिवसाचे व ३० दिवसांचे असताना डवऱ्याचा फेर द्यावा. यावेळी निदंणी करुन तण व्यवस्थापन करुन तणांचा नायनाट करावा.
पिकाची काढणी व उत्पादन
मटकीचे पीक सर्वसाधारणपणे १२०-१३० दिवसांत तयार होते. पिक पक्व झाल्यानंतर झाड पिवळे पडून सुकायला लागते. अशावेळी विळ्याने कापणी करुन दोन दिवस शेतातच वाळवावे. त्यानंतर पिकाची मळणी करावी.उत्पादन :- ७-८ क्विं./हे. मिळते.
प्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या)दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.(व.ना.म.कृ.वि. परभणी)मो. नं. ७८८२९७८५९
हेही वाचा - Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत