जागतिक उत्पादनात बाजरीचा सर्वात मोठा वाटा (४२टक्के) भारताचा आहे. भारतात अन्नधान्याच्या बाबतीत या पिकाचा २०१२-२०१३ मध्ये बाजरीचे ७३.० लक्ष हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते, त्यापासून ८७.४ लक्ष मेट्रिक टन धान्य उत्पादन मिळाले तर दर हेक्टरी उत्पादकता ११९८ किलो इतकी होती.
महाराष्ट्रातील बाजरी लागवडीचे क्षेत्र ६.४७ लक्ष हेक्टर असले, तरी धान्य उत्पादन ४.२२ लक्ष मेट्रिक टन आणि सरासरी उत्पादकता ६५२ किलो इतकी होती. २०१४ - १५ देशाच्या तुलनेत राज्याची कमी उत्पादकतेची कारणमीमांसा केल्यास हे पीक प्रामुख्याने हलक्या व भरड जमिनीत घेणे, पावसाची अनिश्चितता, कोड व रोग नियंत्रणाचा अभाव हे होय.
त्यामुळे सुधारित तंत्राचा खालीलप्रमाणे वापर केल्यास या पिकाचे भरघोस उत्पादन मिळू शकते.
हवामान व जमीन
बाजरी पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने ते कोरडवाहुतही चांगले येते.
बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु हा ६.२ ते ७.७ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी - वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
या पद्धतीत मृगाचा पाऊस पडण्यापूर्वी जमिनीच्या खोलीप्रमाणे ४ ते ६ इंच (१० ते १५ सें.मी.) खोलीच्या ४५ सें.मी. अंतरावर उताराच्या आडव्या दिशेने सन्या तयार करुन ठेवाव्यात. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब स-यामध्ये संचित करता येतो.
पूर्वमशागत
जमिनीची लोखंडी नांगराने १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी व जमीन उन्हाळ्यात तापू द्यावी. जमीन चांगली तापल्यानंतर, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी ५ टन शेणखत किंवा २.५ टन गांडूळ खत शेतात पसरवून टाकावे, म्हणजे कुळवणी बरोबर ते जमिनीत समप्रमाणात मिसळले जाते.
पेरणीची वेळ
बाजरीची पेरणी १५ जून ते १५ जुलै या दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. खरीप हंगामात पर्जन्यवृष्टी उशिरा झाल्यास पेरणी ३० जुलैपर्यंत करण्यास हरकत नाही. बाजरी पिकाची पेरणी साधारणत: ३० जुलैपर्यंत केल्यास उत्पादनात सरासरी १० टक्के घट येण्याची शक्यता असते.
सुधारीत व संकरित जाती
बाजरीच्या सुधारित व संकरित वाणांची जमिनीच्या मगदुराप्रमाणे, नैसर्गिक हवामान व पाऊस यांचा एकत्रित विचार करुन निवड करावी. हलक्या जमिनीत व कमी आणि अनियमित पावसाच्या क्षेत्रात सुधारित वाणांची लागवड करावी. मध्यम जमिनीत व समाधानकारक पर्जन्यमान विभागात संकरित वाण जास्त उत्पादन देऊ शकतात.
क्र. | वाणाचे नाव | पिकाचा कालावधी | उत्पादनक्षमता (क्विंटल / हे) | वाणांची वैशिष्ट्ये |
अ) | संकरित वाण | |||
१ | शांती | ८० ते ८५ | सरासरी ३० | मध्यम उंची, टपोरे व राखी रंगाचे, भाकरी चवीला चांगली आणि गोसावी रोगास प्रतिकारक्षम |
२ | आदिशक्ती | ८० ते ८५ | सरासरी ३० - ३२ | मध्यम कालावधी, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, घट्ट कणीस, ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे दाणे, बिजोत्पोदकासाठी फायदेशीर. |
३ | एएचबी १६६६ | ७५ ते ८० | सरासरी ३० - ३५ | बाजरी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येते हा संकरीत वाण तयार केला आहे. गोसावी रोगास प्रतिकारक आहे |
ब) | सुधारित वाण | |||
१ | धनशक्ती | ७४ ते ७८ | सरासरी १९ ते २२ | कणीस घट्ट, दाणे टपोरे व राखी रंगाचे, लोहाचे प्रमाण अधिक, गोसावी रोगास प्रतिकारक्षम |
बियाणे आणि बीजप्रक्रिया
पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो चांगले निरोगी बियाणे वापरावे. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.
अ) २0 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी) करावी. बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मिठ विरघळावे.
ब) मेटॅलॅक्झील ३५ एसडी याची बीजप्रक्रिया (गोसावी रोगासाठी) पेरणीपूर्वी बियाण्यास ६ गॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
क) अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया २५ ग्रॅम अझोस्पिरीलम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच स्फुरद विरघळविणा-या जिवाणूची २५ गॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
पेरणीची पध्दत
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी व दोन ओळीत ४५ सें.मी. आणि दोन रोपामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवावे (हेक्टरी सुमारे १.५० लाख प्रोपे). पेरणी ३ ते ४ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करु नये.
रासायनिक खताचा वापर
माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत. मध्यम जमिनीसाठी हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश व हलक्या जमिनीसाठी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश खतांचा अवलंब करावा. पेरणीच्यावेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. तदनंतर २५ ते ३० दिवसांनी जमिनीत ओलावा असताना किंवा पाऊस पडल्यानंतर अर्धे नत्र द्यावे.
विरळणी
हेक्टरी रोपाची संख्या योग्य व मर्यादित राहण्याकरिता पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. उगवण विरळ झाल्यास उगवणीनंतर ४-५ दिवसांनी नांगे भरुन घ्यावे अथवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी रिमझिम पाऊस चालू असताना रोपाची पुर्नलागण करावी.
आंतरमशागत / तण नियंत्रण
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ वेळा कोळपण्या आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे ३० दिवस शेत तणविरहीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे किंवा एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये अॅट्राझिन तणनाशकाची १.० किलो प्रति हेक्टरी पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व एक खुरपणी पेरणीनंतर २५-३० दिवसांच्या आत करावी.
पाणी व्यस्थापन
बाजरी हे कोरडवाहूचे पीक आहे. खरीप बाजरी पिकास २५ ते ३० सें.मी. इतकी पाण्याची गरज असते. परंतु पाण्याचा ताण पडल्यास व पाणी उपलब्ध असल्यास खालील संवेधनक्षसंवेधनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.
पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरते वेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे. आंतरपीक : हलक्या जमिनीत बाजरी + मटकी, तर मध्यम जमिनीत बाजरी + तूर (२:१ या प्रमाणात) आंतरपीक घ्यावे. दोन ओळीत ३0 सें. मी. अंतर ठेवावे.
उत्पादन : वरील सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास धान्याचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल आणि चर्याचे ५ ते ७ टन उत्पादन मिळू शकते.
लेखक
डॉ. बहुरे जी. के.
प्राचार्य, कृषि महाविद्यालय खंडाळा ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर मो.नं. ८२७५३२१६०७