फळबागांमध्ये नियमितपणे रोगग्रस्त किंवा रोगट फांद्या, मृत झालेल्या फांद्या काढण्यासाठी किंवा झाडास विशिष्ट आकार देण्याकरिता फांद्यांची छाटणी करतात.
असे केल्यानंतर झाडांच्या उघड्या राहिलेल्या जखमा भरून काढण्यासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जातो. यासाठी बोर्डो मलम हे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक म्हणून उपयोगी पडते आणि पिकांचे रोगांपासून संरक्षण होते.
बोर्डो मलम बनवण्याची पद्धत
आवश्यक साहित्य
मोरचूद (निळे स्फटिक) १ किलो, कळीचा चुना १ किलो, पाणी १० लिटर.
कृती
- सर्वप्रथम मोरचूद खडे बारीक करून घ्यावेत आणि ते ५ लिटर पाणी असलेल्या मातीच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या भांड्यात भिजत घालावेत.
- दुसऱ्या स्वतंत्र मातीच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या बादलीत कळीचा चुना ५ लिटर पाण्यात टाकून चुन्याचे द्रावण तयार करावे.
- मोरचूद द्रावण हळुवारपणे चुन्याच्या द्रावणात टाकावे असे करीत असताना लाकडी काठीच्या सहाय्याने मिश्रण हळूहळू ढवळत राहावे.
- याप्रकारे तयार केलेल्या मिश्रणात लोखंडी सळई किंवा विळा बुडवून तो बाहेर काढावा जर लालसर रंग लोखंडी भागावर आढळला नाही तर मोरचूद योग्य प्रमाणात आहे असे समजावे जर लालसर रंग आढळला तर मोरचूद अधिक असल्याने द्रावणाचा कमी झालेला सामू वाढविण्याकरिता त्यात अधिक चुना घालावा आणि परत द्रावण तपासून पाहावे.
- नंतर योग्य प्रकारे ढवळून द्रावण तयार झालेल्या मलमाचा छाटणी केलेल्या झाडाच्या खोडास लावण्यासाठी वापर करावा.
अधिक वाचा: फळपिकांत बुरशीजन्य रोगापासुन बचावात्मक उपायासाठी जालीम मिश्रण