उन्हाळी हंगामात फळबागाचे व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात फळबागांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. या हंगामातील वाढते तापमान मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन गरम वाफेच्या झळा ई. कारणांमुळे फळझाडांवर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. उन्हाळी हंगामात फळबागा जगवण्यासोबत पिकांचे उत्पादन अधिक मिळवण्यासाठी खालील पद्धतीने नियोजन करावे.
जमिनीची मशागत
उन्हाळ्यापूर्वी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण तपासून घ्यावे ते कमी असणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा ताण या काळात कमी पडल्यास त्या भेगाळतात आत खोलवर असणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. तसेच झाडांना पाणी दिल्यास ते भेगात खोलवर जाते. व पाणी झाडात उपलब्ध होत नाही अशा जमिनीस कोळपणी, निंदणी, करावी व जमीन झाकण्यासाठी आच्छादनाचा वापर केल्यास भेगा बुजून सिंचनाची कार्यक्षमता वाढते.
आच्छादनाचा वापर
उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे झपाट्याने कमी होते. त्यामुळे जमिनीतील ओलावा राखण्यासाठी पॉलिथिन फिल्म किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर फायदेशीर ठरतो. ८० ते १०० मायक्रोन जाडीची प्लास्टिक फिल्म वापरता येते. परंतु ती थोडी महाग पडते.
तेव्हा अतिरिक्त उपाय म्हणून सेंद्रिय आच्छादनांमध्ये वाढलेले गवत, लाकडाचा भुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काढ, भाताचे तूसगिरीपुष्प इ. चा समावेश होतो. वरील सेंद्रिय आच्छादने ड्रीपखाली चार ते सहा इंच जाडीच्या थरात पसरवितात. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन ओळ टिकून राहते आणि जमिनीचा पोत सुधारतो.
जमिनीतील उपलब्धता वाढवण्यासाठी उपाययोजना
उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी ज्या भागात हंगामाचे पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्या ठिकाणी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे, साठवणे व मुरवणे यासाठी जलसंधारणाची कामे उन्हाळ्यात करून घ्यावी. त्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही.
फळबागेतील होणारे बाष्पीभवन कमी करणे
रोपवाटिका तसेच एक ते दोन वर्षांची फळ झाडांची कलमे यांना रोपांच्या वर छोटे मांडव करून सावली करावी. फळबागेभोवती वारा प्रतिबंधक वृक्ष जसे - शेवरी, सुबाभूळ, सरू, निलगिरी, अशोका इ. झाडे दक्षिण पश्चिम दिशेने लावावीत.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात झाडांच्या वाढीसाठी अत्यंत चयापचनाच्या क्रियेसाठी पाण्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे नियमित पुरेसे पाणी दिल्यास त्यांची वाढ व्यवस्थित राहते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचनाचा शक्यतो वापर केल्यास पाण्याची बचत होते. झाडाला योग्य प्रमाणात पाणी मिळते. शक्यतो या हंगामात प्रवाहि पद्धतीचा अवलंब करू नये.
तसेच मडका सिंचन पद्धत कमी खर्चिक व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची पद्धत आहे. लहान झाडांसाठी पाच ते सहा लिटर तर मोठ्या झाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावेत. किंवा झाडांच्या बुध्याजवळ काठीच्या आधाराने सलाईनच्या बाटल्या वापरून पाणी देता येते. जमिनीचे प्रकार, झाडाचे वय लक्षात घेऊन या हंगामात तीन ते चार दिवसांनी नियमित पाणी द्यावे.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळ पिकांची निवड
पाण्याची बचत करण्यासाठी अधिक पाणी लागणाऱ्या फळ पिकांपेक्षा कमी पाण्यात येणारी फळे पिके निवडावी. वनस्पतींच्या प्रकारावरून काही फळ पिकांना कमी किंवा अधिक पाणी लागते. पानांचे एकूण क्षेत्रफळ खोलवर जाणारी किंवा उथळ असणारी मुळे यावरून कुठल्या पिकास पाणी कमी किंवा जास्त लागते हे ढोबळ मनाने ठरविता येते. कमी पाणी असणार्या क्षेत्रात कोरडवाहू फळझाडे निवडावीत.
अति उष्णतेपासून खोडाचे रक्षण करणे
फळबागेत प्रखर सूर्यप्रकाश सरळ खोडावर पडल्यास खोडास इजा पोहचू शकते, खोड तडकते. त्यासाठी सुतळीच्या साह्याने खोडाच्या संपूर्ण भागावर गवत किंवा बारदाने कार्बाव्हील भुकटी खोडावर धुरळून घट्ट बांधावेत. पाण्याचे दुर्भिक्ष असणार्या भागात फळ झाडांच्या खोडांना स्वच्छ ब्रशने बोर्डो पेस्ट लावावी. त्यामुळे खोडांचे उन्हापासून रक्षण होईल.
होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी करणे
पिकांने शोषण केलेल्या पाण्यापैकी ९०% पाणी पिकांचे/झाडांचे अवयव जसे पाने, खोडातून बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. त्यामुळे झाडांची हलकी छाटणी करून पानांची/फळांची संख्या कमी करावी. कमी पाणीसाठा असणाऱ्या शेतकऱ्यांनी फळ संख्या मर्यादित ठेवावी. त्यामुळे झाड सशक्त राहून पाण्याची बचत होते. छाटणी केलेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.
फळझाडांच्या पानातून बाष्पीभवन कमी होण्यासाठी (केओलीन) पाच ग्रॅम/प्रति लिटर १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. शक्य असल्यास सायंकाळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा मारावा. त्यामुळे झाड फळझाडांच्या पानांचे तापमान कमी होऊन पानांद्वारे पाण्याचे उत्सर्जन कमी होते. व कर्ब ग्रहणाची क्रिया सुधारते.
लेखक
डॉक्टर जी एम वाघमारे
प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर
डॉक्टर आर व्ही नाईनवाड
सहाय्यक उद्यानविद्यावेत्ता अधिकारी, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर
श्री. पी जी सुरडकर
कृषी सहाय्यक, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर
हेही वाचा - भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी