सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते.
एकदा प्रमाणित बियाणे पेरल्यानंतर त्यापासून उत्पादीत बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात विक्रिसाठी आलेल्या बियाण्यांचा आग्रह न धरता स्वतःकडील बियाणे वापरावे. घरचे बियाणे वापरल्यामुळे बियाणे खर्चात बचत करता येईल.
यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आपल्या शेतामध्ये गेल्यावर्षी प्रमाणित बियाण्यांपासून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पादनातून स्वतःकडील बियाणे पेरणीसाठी वापरावे.
कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सोयाबीन पेरणी करीता हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. यासाठी उगवण क्षमता ७० टक्के असणे आवश्यक आहे. घरचे बियाणे पेरणीसाठी वापरायचे असल्यास प्रथम बियाणांची उगवणक्षमता तपासणी करणे आवश्यक आहे.
बियाणाच्या उगवणक्षमता तपासणीअंती उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास जेवढया प्रमाणात उगवणशक्ती कमी आहे तेवढया प्रमाणात प्रती हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करीता वापरावे.
सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणी पद्धत- सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासण्यापूर्वी बियाणे चाळणी करून स्वच्छ करावीत. त्यातील काडी, कचरा, फुटलेले/भेगा पडलेले बियाणे काढून टाकावे.- उगवणक्षमता तपासण्यासाठी मोठे कागद ६ पाने एकत्रित घेऊन त्याच्या साधारणतः ३ सें.मी. रुंदीच्या १० घड्या घालून तो गुंडाळा पाण्यात बुडवून काढावा.- नंतर पाणी पूर्णपणे निथळू द्यावे व तो कागद जमिनीवर आंथरूण प्रत्येक घडीमध्ये १० बियाणे ठेवावे.- एकानंतर एक घडीमध्ये बियाणे ठेवल्यानंतर तो गुंडाळा दोन्ही बाजुंनी रबरने बांधून घरातच सावलीत ठेवावा.- आवश्यकतेनुसार या कागदाच्या गुंडाळ्यास रोज पाणी द्यावे.- ४-५ दिवसानंतर हा गुंडाळा सावकाश उकलावा, प्रत्येक घडीमधील मोड आलेल्या सशक्तरोपांची संख्या मोजावी.- कागदाच्या प्रत्येक घडीतील एकूण १०० बीयाणांपैकी उगवून आलेल्या बियाणांचे शेकडा प्रमाण मोजावे.- अशाच प्रकारे १०० दाणे गोणपाटात किंवा कुंडीत मातीत टाकून देखील उगवणक्षमता तपासता येते.
दुसरी पद्धत- दुसऱ्या पद्धतीमध्ये १०० सोयाबीन बियाणे ५ ते १० मिनिटे पाण्यात भिजवावे.- ते बियाणे पाण्याबाहेर काढल्यानंतर काळजीपूर्वक निरीक्षण करावे.- ज्या बियाणावर सुरकुत्या पडल्या असतील ते बियाणे उगवणक्षम आहे, असे समजावे.- सुरकुत्या पडलेल्या बियाणांची संख्या ७० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते बियाणे पेरणीस योग्य समजावे.- बियाणाच्या तपासणीअंती उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास जेवढ्या प्रमाणात उगवणशक्ती कमी आहे तेवढ्या प्रमाणात प्रती हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करीता वापरावे.
प्रा. अपेक्षा कसबे विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृविके, तुळजापूर, जि. उस्मानाबाद
अधिक वाचा: हिरवळीच्या खतांना शेतीत गाडूया, मातीला समृद्ध करूया