वाल किंवा कडवा हे कोकणातील पूर्वापर चालत आलेले रब्बी कडधान्य पीक असून, भात कापणीनंतर जमिनीच्या अंग ओलाव्यावर मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जमिनीत ओलाव्याचा साठा कमी असल्यास एखादे संरक्षित पाणी देऊन हे पीक घेतले जाते.
हे पीक भातानंतर जमिनीत शिल्लक अन्नघटक व अंगओलाव्याचा कार्यक्षम वापर करून प्रथिनेयुक्त कडधान्य व गुरांसाठी पौष्टिक काड उपलब्ध करून देते.
तसेच जमिनीची सुपीकता कमी न करता द्विदलवर्गीय असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे वाल है एक हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक आहे.
जमीन
मध्यम आणि गाळाच्या भारी जमिनीत वालाच्या पिकाची वाढ चांगली होते. पाणी धारण क्षमता असलेल्या तसेच पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगले येते.
हवामान
हे पीक मुख्यत्वेकरून रब्बी हंगामात खरीप भातपीक काढणीनंतर उर्वरित अंगओलाव्यावर जमिनीची मशागत न करताही घेता येते. पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान मानवते. ढगाळ व दमट हवामानात पिकाची शाखीय वाढ अधिक होते.
विविध वाण
कोकण कृषी विद्यापीठाने वालाच्या दोन सुधारित जाती विकसित केल्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी याचा फायदा होतो. 'कोकण वाल-१' हे १०० ते ११० दिवसांत होणारे हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पन्न देते. 'कोकण वाल-२' हे १०० ते १०५ दिवसांत होणारे हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पन्न देते.
लागवडीची वेळ
वालाची पेरणी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केल्यास सर्वाधिक उत्पन्न मिळते. उशिरा केलेल्या पेरणीमुळे (डिसेंबर ते फेब्रुवारी) उत्पन्नात ४२.७९, ते ७४.९१ टक्के घट होते.
लागवड
१) खरीप पीक काढणीनंतर ताबडतोब जमिनीत वाफसा असताना एक वेळ नांगरट करावी.
२) जमिनीत हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमीन तयार करताना मिसळावे.
३) त्यानंतर काडीकचरा, धसकटे, तणांचे अवशेष वेचून घेऊन, जमीन समपातळीत त्यानंतर वालाची पेरणी टोकन पद्धतीने करावी.
४) दोन ओळींतील अंतर ३० सेंटीमीटर असावे.
अशा पद्धतीने लागवड केल्यास पेरणीनंतर व फुलोऱ्यानंतर पाण्याचे वेळापत्रक निश्चित करावे. जादा पाण्यामुळे वालाची शाखीय वाढ होते व उत्पन्नात घट होते. कमी पाण्यामुळे शेंगा कमी लागतात, अपुरी वाढ होते.
काढणी व साठवण
वालाचे पीक सर्वसाधारणपणे १०० ते ११० दिवसांत तयार होते. पिकाची काढणी दोन प्रकारे केली जाते. शेंगा वाळतील तशी तोडणी केली जाते. शेंगांची तोडणी पूर्ण झाल्यावर चार ते पाच दिवस शेंगा कडक उन्हात वाळवल्यानंतर त्याची मळणी काठीने झोडपून करतात. दुसऱ्या प्रकारात सर्वसाधारणपणे सर्व शेंगा झाडावर वाळेपर्यंत ठेवल्या जातात. वालाचे दाणे माती/मिठाचा थर देऊन वाळविले तर भुंगा लागत नाही.
अधिक वाचा: वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज