Join us

Valentine Day : गुलाबाची पंढरी असलेल्या मावळात गुलाब शेतीमुळे समृद्धी! 5 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध

By दत्ता लवांडे | Published: February 08, 2024 10:38 PM

व्हलेंटाईन डे आणि गुलाबाचं एक वेगळंच नातं आहे.

पुणे : व्हलेंटाईनचा आठवडा. हा जगभरातील प्रेमवीरांचा आठवडा असतो. या आठवड्यात दोन व्यक्ती एकमेकांवर असलेलं प्रेम गुलाबाचं फूल देऊन व्यक्त करत असतात.  तर गुलाब उत्पादनाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात गुलाबामुळे चांगले दिवस आले आहेत. व्हलेंटाईनच्या या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबाची निर्यात होत असल्यामुळे मावळातील गुलाब उत्पादकांचे अर्थकारण बदलले आहे. 

दरम्यान, दैनंदिन बाजारात गुलाबाच्या एका काडीला दोन ते पाच रूपयांच्या दरम्यान दर असतो. तेच दर व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने एका काडीला १० ते १२ रूपयांच्या आसपास पोहोचले आहेत. जे गुलाब निर्यात केले जाते त्या गुलाबाला १५ रूपयांपर्यंत दर मिळत असल्याचं मावळातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना व्हॅलेंटाईनमुळे चांगले अर्थार्जन होताना दिसत आहे.

सध्याचे दर कमी

यंदाच्या व्हॅलेंटाईनचा सीझन २० जानेवारीपासून सुरू झाला असून या काळात शेतकऱ्यांना निर्यातीसाठी एका गुलाबाच्या फुलाल १२ ते १५ रूपयांच्या आसपास दर मिळाला आहे. तर लोकल मार्केटमध्ये सद्या १० ते १२ रूपये प्रतिफूल एवढा दर मिळताना दिसत आहे.

निर्यात

देशातील दिल्ली, कोलकत्ता, बंगळूर, हैद्राबाद, गुवाहटी, छत्तीसगढ, इंदौर, पटना, राजकोट, सुरत, जम्मू, अहमदाबाद, पणजी या ठिकाणी मावळातून गुलाबाची निर्यात केली जाते. तर येथील गुलाबाची प्रत चांगली असल्यामुळे देशभरातून या गुलाबाला चांगली मागणी असते. त्याचबरोबर हॉलंड, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, युरोप येथे निर्यात होते. लोकल मार्केटपेक्षा निर्यातीमुळे जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते असं येथील शेतकरी सांगतात.

५ ते ६ हजार रोजगाराची उपलब्धता

मावळातील गुलाब शेतीमुळे जवळपास ५ ते ६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश, झारखंड येथील कामगार काम करतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा,  उत्तर महाराष्ट्र आणि काही ठिकाणी विदर्भातील कामगार काम करतात. अनेक शेतकऱ्यांकडे स्थानिक तरुणांना मॅनेजर आणि सुपरवायझर म्हणून काम देण्यात येते.

उत्तम प्रतीच्या मालामुळे चांगला दर

येथील पोषक वातावरणामुळे उत्पादित होणाऱ्या गुलाबाची प्रत चांगली असते. त्यामुळे येथील गुलाबाला चांगला दर मिळतो. यंदाच्या वर्षातील निर्यात काही प्रमाणात कमी झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाल्याचं दिसून येत आहे. पण येथील मालाला वर्षभर देशभरातून मागणी असते. व्हॅलेंटाईनच्या कालावधीमध्ये या परिसरातील गुलाबाला मोठी मागणी असते.

उत्पन्न

गुलाब शेतीमध्ये मजूर जास्त लागतात. त्याचबरोबर बेंडिंग, क्लिपिंग, मशागत, खते, औषधे आणि रोजचे कटिंग यासाठी मजूरांची गरज असते. गुलाबाची सरासरी दराने विक्री झाली तरी वर्षाकाठी १५ ते २० लाख रूपयांचे फुले विक्री होतात. त्यातून जवळपास ७० टक्क्यांपर्यंत खर्च होतो. तो वजा केला तर एकरी वर्षाकाठी पाच लाखांचे उत्पन्न होते. सुरूवातील पॉलीहाऊस आणि लागवडीसाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यानंतर फक्त दैनंदिन खर्च करावा लागतो.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजार